International Tea Day 2025: चहा हे केवळ एक पेय नसून लोकांची भावना आहे. चहा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर गरमागरम कडक चहा प्यायल्याशिवाय दिवसाची चांगली सुरूवातच होत नाही. बरेच लोक दिवसातून अनेक कप चहा पितात. तर काही लोक सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळी चहा पितात. भारतात जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात वाफळलेल्या गरमागरम चहानं होते. जर मिळाला नाही तर अनेकांना काही सुचतही नाही, इतकी त्यांना चहाची सवय असते. काही लोक जेवण झाल्या झाल्या चहा पितात. पण चहाबाबत हा प्रश्न नेहमीच विचारला जातो की, जेवण झाल्यावर लगेच चहा पिणं योग्य की अयोग्य? हेच आज आपण पाहणार आहोत.
जेवणानंतर लगेच चहा पिण्याचे नुकसान
चहामधील काही तत्व पचनक्रियेला थेट प्रभावित करतात. चहामधील टॅनिन आणि कॅफीनसारख्या तत्वांमुळे पचनक्रिया व्हावी तशी होत नाही. खासकरून टॅनिनमुळे जेवणातून मिळणाऱ्या आयर्नचं अॅब्जॉर्बशन व्यवस्थित होत नाही. अशात ज्यांना जेवणानंतर लगेच चहा पिण्याची सवय आहे, त्या लोकांमध्ये रक्ताची कमतरता होण्याचा धोका असतो.
जेवणानंतर लगेच चहा पिण्याची सवय असेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. या सवयीमुळे शरीराला जेवणातील पोषक तत्व मिळण्यास अडचण होते. कॅफीनमुळे पोटात अॅसिडचं उत्पादन वाढतं, ज्यामुळे हार्टबर्न आणि अॅसिडिटी होते. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला ही सवय असेल तर पचन तंत्र कमजोर होतं, थकवा जाणवतो, कमजोरी जाणवते.
जेवणानंतर किती वेळानी प्यावा चहा?
एक्सपर्ट सांगतात की, जेवण केल्यावर लगेच चहा पिणं टाळलं पाहिजे. पचनक्रिया योग्यपणे होण्यासाठी वेळ द्यायला हवा. त्यासाठी जेवण आणि चहा पिण्याच्या वेळेत साधारण २ तासांचं अंतर असावं.
जेवण केल्यावर १० ते १५ मिनिटं हलका वॉक करायला हवा, यानं पचनक्रिया चांगली होते. हवं तर तुम्ही जेवण केल्यावर थोडं कोमट पाणी पिऊ शकता. जेवण झाल्यावर तुम्ही लिंबू पाणीही पिऊ शकता. जर तुम्हाला पचनासंबंधी समस्या नेहमीच राहत असतील तर वेळीच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.
