What to mix with milk to sleep: कधी जास्त तणावामुळे, कधी आजारी असल्यामुळे तर कधी जास्त विचारामुळे अनेकांना रात्री चांगली झोपच येत नाही. तासंतास बेडवर पडून राहूनही डोळ्याला डोळा लागत नाही. अशात प्रसिद्ध आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी झोपेच्या समस्येवर एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले आहे की, झोप न येण्याची तक्रार असल्यास झोपण्यापूर्वी एक खास स्लीप टॉनिक बनवून प्यावे. चला पाहुयात हे टॉनिक कसं बनवायचं आणि त्याचे फायदे काय आहेत.
लागणाऱ्या वस्तू
2 चमचे बडीशेप
4 बदाम
1 चमचा खसखस
अर्धा चमचा मिश्री
1 दाणा वेलदोडा
एक चिमूट काळी मिरी
एक चिमूट जायफळ
4 भिजवलेल्या काळ्या मनुका
3 केसरी धागे
बनवण्याची पद्धत
सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र टाकून बारीक पूड करा. ही पूड एका स्वच्छ, एअरटाइट डब्यात स्टोर करा. हे मिश्रण 2 ते 3 आठवडे उत्तम टिकतं. रोज झोपण्यापूर्वी अर्धा चमचा पूड गरम दूधात मिसळा आणि प्या. अजून चांगल्या परिणामांसाठी यात एक थेंब तूपही घालू शकता.
कसा मिळतो फायदा?
श्वेता शाह यांच्या मते, हे मिश्रण वात आणि पित्त दोष संतुलित करतं. हे दोष वाढल्यास मन अस्वस्थ होतं, ओव्हरथिंकिंग वाढतं आणि झोप येण्यात अडचण निर्माण होते. खसखस, बदाम आणि जायफळ मज्जासंस्थेला शांत करून मेंदू रिलॅक्स करतात. तर बडीशेप, वेलदोडा आणि काळी मिरीनं पचनक्रिया सुधारते, त्यामुळे शरीर नैसर्गिकपणे गाढ झोपेच्या स्थितीत जातं.केसर आणि मनुका – शरीरातील ऊर्जा पुनर्जीवित करतात, त्यामुळे सकाळी उठल्यावर ताजेपणा आणि हलकं वाटतं.
श्वेता शाह सांगतात की, जर तुम्ही हा स्लीप टॉनिक रोज झोपण्यापूर्वी घेतला, तर काही दिवसांतच फरक जाणवू लागेल. रात्री गाढ झोप येईल आणि सकाळी मन शांत व शरीर ताजेतवाने वाटेल.