Join us

पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नयेत यात कितपत तथ्य? खात असाल तर लक्षात ठेवा २ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2023 10:20 IST

How About having leafy Vegetables in Monsoon Season Diet Tips : पावसाळ्याच्या काळात आहाराची योग्य पद्धतीने काळजी घ्यायला हवी.

पावसाळा जितका आल्हाददायी असतो तितकाच तो आजारांचा म्हणूनही ओळखला जातो. या काळात अग्नी मंद होतो त्यामुळे खाल्लेले नीट पचत नाही. तसेच दूषित पाणी, शिळे किंवा बाहेरचे अन्नपदार्थ यांमुळे पचनाच्या तक्रारी निर्माण होतात. तसेच हवेत कधी दमटपणा तर कधी गारवा असल्याने संसर्गजन्य आजार उद्भवतात. यामध्ये ताप, सर्दी, खोकला यांबरोबरच त्वचेच्या तक्रारीही डोकं वर काढतात. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात आहाराची योग्य पद्धतीने काळजी घ्यायला हवी (How About having leafy Vegetables in Monsoon Season Diet Tips). 

पावसाळ्यात सगळीकडे पाणी आणि चिखल असतो यामध्ये विषाणूंची वाढ पटकन होते. त्यामुळे पालेभाज्या दूषित होण्याचे प्रमाण जास्त असते. पालेभाज्यांमध्ये लोह, फायबर, आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त असल्यामुळे या आहारात नियमितपणे असाव्यात असे सांगितले जाते. मात्र पावसाळ्यात या भाज्यांमधून संसर्ग होण्याची शक्यता असल्याने पावसाळ्यात शक्यतो पालेभाज्या टाळलेल्या जास्त चांगल्या. पण खायच्याच असतील तर मात्र कोणती काळजी घ्यायला हवी पाहूया.

(Image : Google)

१. पालेभाज्या खरेदी करताना 

पालेभाजी खरेदी करताना ती कोरडी आणि स्वच्छ असेल याची काळजी घ्यावी. बरेचदा पालेभाजी खरेदी करताना ती वरच्या बाजुने अगदी चांगली दिसते पण आतून पूर्ण सडलेली असते. अनेकदा या भाजीत बराच चिखलही असतो. पैसे देऊन महाग भाजी आणली आहे तर टाकून द्यायचे जीवावर आल्याने आपण भाजी निवडताना जास्तीत जास्त पाला घेतो. पण हा पाला ओलसर आणि खराब झाला असेल तर पोटाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात पालेभाजी खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी.

२. पालेभाज्या साफ करताना 

(Image : Google)

निवडलेली भाजी साफ करताना ती एका चाळणीत घेऊन योग्य पद्धतीने साफ करायला हवी. अनेकदा आपण भाजी वरचेवर धुतो आणि घाईत तशीच शिजवतो किंवा फोडणीला घालतो. मात्र शक्यतो प्रत्येक पान नीट धुतले जाईल असे पाहावे. शक्य असल्यास थोडे कोमट पाणी घेऊन भाजी धुवावी. एरवी आपण फ्लॉवर किंवा अन्य किटक असणाऱ्या भाज्या ज्याप्रमाणे मीठाच्या पाण्यात घालून ठेवतो, त्याचप्रमाणे पालेभाजीही काही मिनीटे मिठाच्या पाण्यात घालून धुवावी आणि मगच करायला घ्यावी. त्यामुळे भाजीवर काही किटाणू किंवा विषाणू असतील तर ते निघून जाण्यास मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलआहार योजनाभाज्या