दररोजच्या धावपळीच्या जीवनात शरीराच्या थकव्याकडे आपण दुर्लक्ष करतो. हात, डोके सारेच दुखते. मात्र सगळ्यात जास्त त्रास देतात पाय. एकदा का पाय दुखायला लागले की चालायचेही कष्ट घेणे नको वाटते. (hot water therapy for legs can work magically, simple remedy with many benefits )त्यात पाय हा शरीराचा सगळ्यात जास्त भार सहन करणारा भाग आहे. सतत चालणे, उभे राहणे यामुळे पायांमध्ये वेदना, सूज, थकवा निर्माण होतो. तसेच चुकीच्या चपला वापरल्या तरी पायाला त्रास सहन करावा लागतो. पायाच्या वेदना कमी करण्साठी आपण अनेक उपाय करतो.मात्र यावर एक घरगुती आणि प्रभावी उपाय म्हणजे गरम पाण्यात पाय बुडवून बसणे. यामुळे पायांच्या स्नायूंना आराम मिळतो, रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा दूर होतो. अगदी सोपा उपाय आहे मात्र पायाला फारच आराम देणारा ठरतो.
गरम पाण्याच्या संपर्काने त्वचेतील छिद्रं उघडतात आणि त्वचा स्वच्छ होते. पायात अडकलेली माती, घाण निघून जाते. पायांची दुर्गंधी, मातीमुळे होणारे संसर्ग कमी होतात. तसंच, यामध्ये जर थोडी तुरटी फिरवली तर त्वचेवरील जंतूही मरतात आणि पायांच्या तळव्यांवर पाण्यामुळे येणारे फोड, जखमा यापासूनही आराम मिळतो. दुसरा पर्याय म्हणजे मीठ. गरम पाण्यात मीठ घातल्यास पायाची सूज आणि वेदना कमी होतात. ईप्सम सॉल्ट किंवा साधे सैंधव मीठ वापरले तरी चालते.
गरम पाण्यात पाय बुडवून बसल्याने केवळ शरीरालाच नव्हे तर मनालाही शांतता मिळते. त्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. अनेकांना झोप न लागण्याची तक्रार असते, पाण्यात पाय बुडवल्यावर थकवा कमी होतो आणि त्यामुळे झोपही सुधारते. रात्री झोपण्याआधी १५-२० मिनिटे पाय गरम पाण्यात बुडवून ठेवल्यास झोप पटकन लागते आणि शरीर संपूर्णपणे रिलॅक्स होतं.
एकूणच, गरम पाण्यात पाय बुडवून बसणे हा एक सोपा, नैसर्गिक आणि आरोग्यदायी उपाय आहे जो पायांच्या दुखण्यावर आणि एकंदर स्वास्थ्य सुधारण्यावर सकारात्मक परिणाम करतो. हे दररोज केल्यास पाय सशक्त, स्वच्छ आणि आरामदायक राहतात. पायांसाठीच नाही तर एकूणच थकवा कमी करण्यासाठी गरम पाणी फायद्याचे ठरते.