Join us

उष्माघातामुळे १२ वर्षाच्या मुलाचा गेला जीव, उन्हाचा कहर- स्वत:चा जीव तुम्ही कसा सांभाळाल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 16:39 IST

Heat stroke : उष्णाघातापासून बचाव करण्यासाठी काय उपाय करावे आणि आपला जीव कसा वाचवावा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Heat stroke : राज्यातील अनेक शहरांमध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ज्यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा धोका वाढतो. दरवर्षी उन्हाळ्यात उष्माघातामुळे अनेकांचा जीव जातो. डॉक्टर किंवा घरातील मोठे लोक नेहमीच घराबाहेर पडतात काय काळजी घ्यावी हे सांगतात. पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अलिकडे शेगावमध्ये सहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका 12 वर्षाच्या मुलाचा उष्माघातामुळे जीव गेला. अशा दुर्दैवी घटना घडल्यावरच लोक जागे होतात आणि मग काळजी घ्यायला लागतात. ही तर तापमान वाढीची सुरूवात आहे पुढे मे महिन्यात सूर्य अधिक आग ओकणार. त्यामुळे उष्णाघातापासून (Heatstroke) बचाव करण्यासाठी काय उपाय करावे आणि आपला जीव कसा वाचवावा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

विदर्भात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. बुलडाण्यातील शेगाव येथे सहावीत शिकणाऱ्या संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्याला कडक उन्हाचा त्रास झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू ओढवला. पालकांनी त्याला अकोला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान संस्कारचा मृत्यू झाला.

हायड्रेटेड रहा

उष्माघातापासून बचाव करण्याचा सगळ्यात सोपा आणि सहज करता येणारा उपाय म्हणजे दिवसभर भरपूर पाणी प्या. यानं शरीर हायड्रेट राहतं. एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि थोडं मीठ टाकून प्यायल्यास एनर्जी मिळेल. लहान मुलं पाणी पिण्यासाठी टाळाटाळ करतात, त्यांना सतत पाणी प्यायला द्यायला हवं.

पाणी असलेली फळं खा

उन्हाळ्यात कलिंगड, खरबूज अशी भरपूर प्रमाणात पाणी असलेली फळं लहान मुलांसोबतच सगळ्यांनी खाल्ली पाहिजे. यानं शरीर हायड्रेट राहतं आणि आतून थंड राहतं. ज्यामुळे वाढत्या तापमानापासून बचाव होतो. तसेच लिंबू, संत्री, अननस, द्राक्ष ही फळंही खाल्ली पाहिजेत. सोबतच नियमितपणे नारळाचं पाणी प्यायला हवं.

कसा असावा आहार?

एक्सपर्ट्सनुसार, जर रोजचा आहार योग्य असेल तर उष्माघातापासून बचाव करता येऊ शकतो. नॅशनल हेल्थ पोर्टलच्या एका माहितीनुसार, लोकांनी उन्हाळ्यात वेगवेगळी ताजी फळं, भाज्या खायल्या हव्यात. इतकंच नाही तर फळांचा ज्यूसही प्यायला हवा. ज्यामुळे शरीराचा डिहायड्रेशनपासून बचाव होतो. तसेच आहारात ताक, दही या गोष्टींचाही समावेश करावा. शरीरात पाणी कमी झालं तर उष्माघाताचा धोका जास्त राहतो. 

सैल आणि सूती कपडे वापरा

सैल आणि सूती कपड्यांचा वापर करणं उन्हाळ्यात खूप फायदेशीर ठरू शकतं. हे कपडे घाम शोषूण घेतात आणि त्वचेला थंडावा देतात. तसेच या दिवसांमध्येड डार्कऐवजी हलक्या रंगाचे कपडे वापरावेत. खासकरून पांढऱ्या रंगाचे कपडे वापराला उन्हाचा त्रास कमी होईल.

बाहेर पडताना काय काळजी घ्याल?

उन्हाच्या दिवसांमध्ये घराबाहेर पडताना दुपट्टा, रूमाल कान आणि डोक्याला बांधावा, सन ग्लासेस लावायला हवाच. यानं उन्हापासून पासून बचाव होतो आणि उष्ण वारे नाका-तोंडात जात नाहीत. सोबत पाण्याची बॉटलही ठेवायला विसरू नका. यानंही उष्माघातापासून बचाव होतो. 

नैसर्गिक उपाय

तुळशीची पानं पाण्यात उकडून हे पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं. गुलाबजलचा वापर चेहऱ्यासाठी करू शकता. यानं त्वचेला थंडावा मिळतो आणि फ्रेशही वाटतं.

टॅग्स : उष्माघातआरोग्यहेल्थ टिप्स