Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Health Tips: थायरॉईडमुळे वाढलेले वजन आणि थकवा होईल दूर! आहारात सामील करा 'हे' ६ पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 10:46 IST

Health Tips: अनेक महिलांमध्ये थायरॉईडची समस्या आढळते, पण केवळ गोळ्यांनीच नाही तर आहारात पुढील पदार्थ समाविष्ट करूनही थायरॉईड नियंत्रणात आणू शकता. 

अलीकडे बदलत्या आणि विशेषतः बैठ्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांना वजन वाढ, पाळीचे त्रास, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात आहार, विहार, विश्रांती यांचीही महत्त्वाची भूमिका असते. फास्ट फूड, जंक फूड मुळे आपण पारंपरिक आणि सात्विक आहार विसरत चाललो आहोत. मात्र, खऱ्या अर्थाने निरोगी शरीरासाठी तेच वरदान आहे. या लेखात आपण थायरॉईड नियंत्रणात ठेवणारे ६ सुपरफूड जाणून घेऊ. 

थायरॉईड (Thyroid) ही शरीरातील एक महत्त्वाची ग्रंथी आहे, जी मेटाबॉलिज्म (Metabolism) आणि ऊर्जेवर नियंत्रण ठेवते. थायरॉईडचे कार्य बिघडल्यास (Hypothyroid किंवा Hyperthyroid) शरीराचे वजन वाढणे, थकवा आणि मूड बदलणे अशा अनेक समस्या येतात.

योग्य औषधोपचारांसोबतच, आहारामध्ये काही विशिष्ट 'सुपरफूड्स' चा समावेश केल्यास थायरॉईड ग्रंथीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे ६ सुपरफूड्स थायरॉॉईडसाठी आवश्यक पोषक तत्त्वे पुरवतात:

१. आयोडीनयुक्त मीठ (Iodized Salt): आयोडीन मिळवण्याचा हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. रोजच्या जेवणात साधे मीठ न वापरता आयोडीनयुक्त मीठ वापरावे. आयोडिन हे थायरॉईड हार्मोन्स तयार करण्यासाठी आवश्यक आहे. 

२. बदाम आणि अक्रोड (Almonds and Walnuts) : ड्रायफ्रूट्स, विशेषतः बदाम आणि अक्रोड, थायरॉईडच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत.बदाम हे मॅग्नेशियम आणि सेलेनियमचे चांगले स्रोत आहेत. अक्रोडामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स थायरॉईडशी संबंधित सूज (Inflammation) कमी करण्यास मदत करतात.

३. कडधान्ये आणि शेंगा (Legumes and Beans) : मसूर, चणे आणि इतर कडधान्ये थायरॉईड असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहेत, विशेषतः ज्यांना हायपोथायरॉईड (Hypothyroid) आहे.  यात आयोडिन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. फायबर पचनसंस्था सुधारते आणि मेटाबॉलिज्म योग्य ठेवण्यास मदत करते.

४. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ (Milk & Dairy): दूध, दही आणि पनीरमध्ये आयोडीन, सेलेनियम आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. थायरॉईडच्या रुग्णांनी आहारात यांचा समावेश करावा. दह्यात प्रोबायोटिक्स (Probiotics) असतात, जे पचनसंस्थेला निरोगी ठेवतात. थायरॉईडचे चांगले कार्य प्रोबायोटिक्सवर अवलंबून असते. दही हे आयोडिनचा नैसर्गिक स्रोत आहे.

५. भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds) : भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक (Zinc) चे प्रमाण जास्त असते, जे थायरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. झिंक शरीराला थायरॉईड हार्मोन्स शोषून घेण्यास मदत करते. दररोज सकाळी मूठभर भोपळ्याच्या बिया खाणे फायदेशीर ठरते.

६. जवस बिया (Flax Seeds) : जवस बिया 'ओमेगा-३'चा उत्कृष्ट स्रोत आहेत. या बियांची पावडर करून दही, स्मूदी किंवा सॅलडमध्ये मिसळून खाऊ शकता. तसेच चिया सीड्समध्ये ओमेगा-३ आणि फायबर दोन्ही भरपूर असतात. हे मेटाबॉलिज्म (चयापचय) सुधारण्यास मदत करतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Beat Thyroid Weight Gain & Fatigue: Top 6 Foods

Web Summary : Combat thyroid issues with these superfoods: iodized salt, almonds, walnuts, legumes, dairy, pumpkin, and flax seeds. These foods provide essential nutrients, aid metabolism, and reduce inflammation, promoting thyroid health and overall well-being.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनामहिलास्त्रियांचे आरोग्यलाइफस्टाइल