Join us

Health Tips: रक्तदाब, मधुमेह होऊच नये यासाठी 'हा' एक बदल करा; आठवड्याभरात फरक दिसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 11:48 IST

Health Tips: पूर्वी चाळीशीच्या उम्बरठ्यावर चष्मा लागायचा, आता मधुमेह, रक्तादाब हे आजार मागे लागतात; त्यापासून दूर राहण्यासाठी आजपासून करा हा एक बदल!

आपले आजी आजोबा, पणजी पणजोबा दीर्घकाळ जगले, तेही निरोगी! शिवाय आयुष्याच्या शेवटपर्यंत चालून फिरून होते. याउलट स्थिती आपली झाली आहे. चार वर्षांच्या मुलांनाही चष्मा लागत आहे, वीस वर्षांच्या तरुणाला हृदयरोग आणि पस्तिशी ओलांडलेल्या गृहस्थाला मधुमेह ग्रासत आहे. याला कारणीभूत आहे आपली जीवनशैली! या सगळ्या आजारापासून दूर राहायचे असेल किंवा ज्यांना हे आजार झाले असतील त्यांना त्या आजाराची तीव्रता कमी करायची असेल तर आजपासूनच आहारात पुढे दिलेला बदल करा, आठवड्याभरात फरक दिसू लागेल. त्यासाठी पूर्ण लेख नक्की वाचा आणि आठवडाभर प्रयोग करून बघा, पुढचा प्रवास आपोआप जमू लागेल. 

नाश्ता करावा राजासारखा, दुपारचे जेवण करावे कामगारासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे - हे विधान आपण अनेकांकडून ऐकले असेल. मात्र हाच आहारमंत्र आहे निरोगी आयुष्याचा! खोटे वाटत असेल तर आठवडाभर प्रयोग करून बघा, तुम्हाला फरक जाणवू लागेल. मात्र त्यासाठी काही नियम अंमलात आणावे लागतील. 

इंटरमिटंट फास्टिंग हा अलीकडे रूढ झालेला शब्द वा जीवनपद्धती भारतीयांसाठी नवी नाही, फक्त आपल्या ती विस्मरणात गेली होती. आपले पूर्वज सूर्यास्तानंतर जेवत नव्हते. त्यामुळे स्वाभाविकच सायंकाळी ६ ते सकाळी ६ त्यांचा १२ तासांचा उपास घडत असे. मग उरलेल्या १२ तासातले जेवण कोणते? तर... 

न्याहारी/ नाश्ता : चहा पोळी, भाजी पोळी, उपमा, पोहे, तांदळाची उकड, भाजी भाकरी, थालीपीठ इ. घरगुती आणि साखर, तेल, तूप विरहित पदार्थ 

दुपारचे जेवण : भाजी पोळी, आमटी भात, लोणचं, चटणी, कोशिंबीर, पापड 

तुम्हाला खोटे वाटेल, पण वरील पदार्थ आणि खाण्याच्या या दोन वेळा पाळल्या तरी शरीराला तेवढा आहार पुरेसा ठरेल. शिवाय शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्त्व त्यातून मिळतील. सायंकाळचे जेवण सोडले आणि अगदीच भूक लागली तर व्हेजिटेबल सूप, टोमॅटो सूप, नाचणीचे आंबील असे द्रव्य पदार्थ घेतले तरी वजन, रक्तातील साखर नियंत्रणात येईल, पचनक्रिया सुधारेल, मधुमेह, रक्तदाब या आजारांपासून दूर राहण्यास मदत होईल. 

आजही गुजराती, जैन घरामध्ये हीच जीवनशैली वापरली जाते म्हणून त्यांच्याकडे आपल्या तुलनेत लोक कमी आजारी पडतात, हे लक्षात येईल. 

हा डाएट नसून ही आपली पूर्वापार जीवनशैली आहे, जी पुन्हा अनुसरणे गरजेचे आहे. त्यासाठी बाहेर मिळणारे पॅकेट फूड काही काळासाठी सोडा, वजन, साखर, रक्तदाब नियंत्रणात आणा, नंतर कधी कधी चिट डे ठरवून चमचमीत पदार्थांचाही आस्वाद घ्या. 

सुरुवात थोडी कठीण जाईल, पण एकदा का ही जीवनशैली अंगवळणी पडली की आरोग्याची किल्ली हाती येईल आणि डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार नाही!

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेहहृदयरोगवेट लॉस टिप्स