Join us

स्लिम होण्याच्या नादात गमावू शकता केस; इंटरमिटेंट फास्टिंगबाबत रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:04 IST

Intermittent Fasting : लाखो लोक वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग (IF) चा अवलंब करत आहेत.

लाखो लोक वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग (IF) चा अवलंब करत आहेत. परंतु तुम्हाला माहीत आहे का की काही आरोग्यदायी फायदे देण्यासोबतच याचा तुमच्या केसांवर वाईट परिणाम देखील होऊ शकतो? इंटरमिटेंट फास्टिंग केल्याने डोक्यावरील केसांच्या वाढीवर परिणाम होतो आणि केस गळू शकतात, असा धक्कादायक खुलासा नुकत्याच झालेल्या चिनी रिसर्चमधून झाला आहे.

हा रिसर्च चीनच्या झेजियांग विद्यापीठातील संशोधकांनी केला होता, ज्यामध्ये असं आढळून आलं की, इंटरमिटेंट फास्टिंग केल्याने उंदरांच्या केसांची वाढ मंदावते. संशोधकांच्या मते, ही प्रक्रिया शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होते, ज्यामुळे केसांच्या स्टेम सेलवर (HFSCs) विपरित परिणाम होतो.

रिसर्चमध्ये असंही दिसून आलं आहे की, काही दिवस इंटरमिटेंट फास्टिंग केल्याने, सामान्य आहार घेतलेल्यांच्या तुलनेत त्यांच्या केसांची वाढ कमी होते. इंटरमिटेंट फास्टिंग करणाऱ्यांचे केस ९६ दिवसांतही पूर्णपणे वाढले नाहीत, तर सामान्य आहार असलेल्यांचे केस ३० दिवसांत पुन्हा वाढले.

केसांच्या वाढीचा वेग १८ टक्क्यांनी कमी

या अभ्यासाचा माणसांवर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी ४९ लोकांवरही प्राथमिक चाचणी घेण्यात आली. या चाचणीत, १८ तास उपाशी राहणाऱ्या सहभागींचा केसांच्या वाढीचा वेग १८ टक्क्यांनी कमी झाला. हा परिणाम उंदरांच्या तुलनेत कमी असला तरी, हे परिणाम सूचित करतात की, इंटरमिटेंट फास्टिंगचा परिणाम माणसांवर देखील होऊ शकतो.

भारतीय डॉक्टर काय म्हणाले?

'द साउथ फर्स्ट'च्या रिपोर्टनुसार, या रिसर्चनंतर भारतीय त्वचारोगतज्ज्ञही या विषयावर आपलं मत मांडत आहेत. प्रख्यात त्वचारोगतज्ञ डॉ. अभिराम रायपट्टी म्हणतात की, दीर्घकाळ उपवास केल्याने अचानक जास्त केस गळतात, ज्याला 'टेलोजन इफ्लुव्हियम' म्हणतात. तथापि, काही तज्ञ असंही मानतात की इंटरमिटेंट फास्टिंग केल्यावर शरीर हळूहळू त्याच्या परिणामांशी जुळवून घेतं आणि केस गळणं तात्पुरतं असू शकतं.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यकेसांची काळजीवेट लॉस टिप्स