सकाळी चहा पिण्याची सवय आपल्याकडे अत्यंत सामान्य आहे. काही लोक सकाळी ब्रश करून वर्तमानपत्र वाचत चहा पिणं पसंत करतात, तर काही लोकांना अंथरुणातून उठल्या उठल्या 'बेड टी' हवा असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, सकाळी उपाशी पोटी चहा पिणं हे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. नुकतेच 'इन्स्टिट्यूट ऑफ लिवर अँड बिलियरी सायन्सेस' (ILBS) चे संचालक आणि लिवर तज्ज्ञ डॉ. शिवकुमार सरीन यांनी एका मुलाखतीत सकाळी चहा पिण्याच्या सवयीला आरोग्यासाठी घातक असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या मते असं का आहे, हे प्रत्येक चहाप्रेमीने जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून उपाशी पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम समजतील.
डॉ. सरीन यांनी चहा पिण्याच्या सवयीला एक 'पारंपारिक सवय' म्हटलं आहे. ते म्हणतात, "अनेक लोक फक्त यामुळे चहा पितात कारण त्यांची आई प्यायची किंवा वडील प्यायचे. म्हणजे त्यांना चहाची गरज नसते, पण घरात एक सवय आहे म्हणून ते चहा पितात. सकाळी चहा पिण्याच्या सवयीमुळे शरीराच्या नैसर्गिक पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो."
"वास्तविक, तुमचे आई-वडील चहा यासाठी प्यायचे कारण त्यावेळी घरं छोटी असायची, ते रस्त्यावर फिरायला जात नसत, त्यामुळे त्यांचं पोट साफ होत नसे. पण आता ती सवय बदलण्याची गरज आहे. जर तुमच्या घरात जागा असेल, तर थोड्या दोरीच्या उड्या मारा किंवा व्यायाम करा जेणेकरून पोट व्यवस्थित साफ होईल. मात्र, चहा पिऊन शौचास जाणं ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे."
डॉ. सरीन यांनी स्पष्ट केले की, सकाळी उठल्यानंतर पोट साफ होण हे 'गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स'मुळे होतं. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये अन्न किंवा द्रव पदार्थ घेतल्यानंतर मोठ्या आतड्याचे आकुंचन होतं आणि मलविसर्जनाची इच्छा निर्माण होते. सकाळी उठल्यावर शरीर ही प्रक्रिया सक्रिय ठेवतं, त्यामुळे बहुतांश लोकांचं पोट सकाळी नैसर्गिकरित्या साफ होतं.
डॉ. सरीन यांनी यावर जोर दिला की, जेव्हा चहा ही रोजची गरज बनते, तेव्हा चहाचे व्यसन आणि पचनाच्या समस्या हळूहळू पोटाचं आरोग्य खराब करू लागतात. पोटाच्या आरोग्यासाठी निरोगी सवयी लावून, सकाळची दिनचर्या योग्य ठेवून आणि पचनासाठी नैसर्गिक मार्ग अवलंबून तुम्ही चहावर अवलंबून न राहता पोट साफ करू शकता.
उपाशी पोटी चहा पिण्याचे तोटे
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो, कारण चहातील टॅनिन्स आणि कॅफीन पोटाला हानी पोहोचवतात.
चहामधील टॅनिन्समुळे पोटात जळजळ होऊन गॅस, अपचन आणि छातीत जळजळ होण्याच्या समस्या उद्भवतात.
चहातील कॅफीन शरीरात एसिडचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे एसिड रिफ्लक्स होतो. यामुळे आयर्न आणि कॅल्शियम शोषण्यात अडथळा येतो, परिणामी एनिमियाचा धोका वाढतो.
उपाशी पोटी चहा घेतल्याने एसिडिटी, झोपेच्या समस्या आणि पचनाचा बिघाड होतो, ज्याचा थेट परिणाम लिव्हरवरही होतो.
