गारवा वाढला की गरमागरम तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा आपोआप वाढते. भजी, वडे, कचोरी, समोसे थंड हवेत हे चटकदार पदार्थ अधिक चविष्ट वाटतात. मात्र असे तळणीचे जास्त प्रमाणात खाल्ले की पचनावर ताण येतो आणि शरीराला दिसणारं न दिसणारं नुकसानही होतं. (Eating fried food in winter causes stomachache -constant trips to the toilet? Take care of 5 things and enjoy winters )म्हणून तळणीचा आनंद घेतानाच काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तळलेल्या पदार्थांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. हे तेल पचनसंस्थेला जड पडते आणि पोटात उष्णता वाढवते. त्यामुळे अॅसिडिटी, ढेकर, जळजळ, गॅस, पोटफुगी या तक्रारी वाढतात. तळणीचे पदार्थ मंदगतीने पचतात म्हणून जेवल्यानंतर जडपणा जाणवतो. थंडीच्या दिवसात शरीर आधीच सुस्त असते, त्यात तळलेले पदार्थ खाल्यावर पचनाची गती आणखी मंदावते.
तळणीमध्ये वापरलेले जुने किंवा जास्त गरम केलेले तेल शरीरात ट्रान्स फॅट्स तयार करतात. हे फॅट्स रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि हृदयावर ताण आणू शकतात. शिवाय तळलेल्या पदार्थांमुळे त्वचेवरही पिंपल्स, कोरडेपणा किंवा चेहर्याला सूज जाणवू लागते.
पचन खराब होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?
तळणी टाळणे हे जरी सर्वोत्तम असले तरी पूर्ण टाळणे नेहमी शक्य नसते. म्हणून संतुलन महत्त्वाचे आहे. तळलेले पदार्थ खाण्यापूर्वी आणि नंतर काही उपाय केले तर पचनावर होणारा ताण कमी करता येतो.
१. रिकाम्या पोटी तळलेले पदार्थ खाऊ नका. आधी थोडे गरम पाणी किंवा कोमट सूप, छान गरम काढा घेतल्यास पोटाला तयारी मिळते.
२. सॅलेडचा लहानसा भाग किंवा एक-दोन पोळीचे घास घेतल्याने पोट लगेच भरत नाही आणि तळणीचे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले जातात.
३. गरमागरम खा पण जेवण समजून खाऊ नका. तळणीचे पदार्थ हे जेवण नाही, ते स्नॅक्ससारखेच खा. नाही थोड्या प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा. जुन्या तेलात परत तळलेले पदार्थ शक्यतो टाळा. तळलेल्या पदार्थांसोबत कांदा, लिंबू किंवा हिरवी चटणी खाल्यास त्रास कमी होतो.
४. तळणीचे काहीही खाल्यावर कोमट पाणी प्यायचे. त्यामुळे घसा खराब होत नाही. पचनाचे त्रास होत नाहीत आणि पोटाला आराम मिळतो.
५. हळद किंवा आल्याचा काढा घेतल्यास पचनाची गती सुधारते. त्यामुळे तळणीचे पदार्थ खाल्यावर झोपताना हळदीचे दूध किंवा आल्याचा काढा प्या.
गारव्यात तळलेले पदार्थ हा आनंदाचा भाग आहे, पण तोच आनंद कायम राहावा म्हणून पोटाची काळजी घेणे गरजेचे आहे. तळलेल्या पदार्थांचा स्वाद अधूनमधून घेतला तर ठीक पण रोज किंवा भरपूर प्रमाणात खाल्ले तर पचन बिघडण्यास वेळ लागत नाही. शरीराला हलके, उबदार आणि सुखद ठेवायचे असेल तर गरमागरम तळणीसोबत पाणी, काढा, हलके जेवण आणि थोडी हालचाल यांचे संतुलन आवश्यक आहे.
