हिवाळा सुरु झाला की शरीराला उब देणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ आहारात समाविष्ट करणे आवश्यक असते. अशावेळी आवळा हा एक नैसर्गिक टॉनिकच मानला जातो. त्याचा तुरट-आंबट स्वाद, पोषणमूल्यांनी समृद्ध रचना आणि शरीर शुद्ध करणारे गुणधर्म यामुळे आवळा हिवाळ्यात विशेष उपयुक्त ठरतो. (Eat fresh amla every day in winter, you won't get a single disease throughout the year, and you'll even start liking the taste.)त्यामुळे या ऋतूत आवळा विविध प्रकारे खाण्याची सवय लावली तर आरोग्यावर अप्रतिम परिणाम दिसू लागतात.
आवळा कच्चा खाल्ला तर तो अत्यंत गुणकारी असतो, परंतु त्याची चव सगळ्यांनाच आवडते असे नाही. काही जण मिटक्या मारत खातात. पण ज्यांना चव आवडत नाही अशांसाठी विविध पदार्थही करता येतात. मीठ आणि हिंग घालून आवळ्याची कोशिंबीर करावी. सकाळी आवळ्याचा रस कोमट पाण्यासह घेतल्यास ऊर्जा वाढते आणि त्वचा अधिक चमकदार दिसते. आवळा किसून त्यात मध मिसळून खाल्ल्यास खोकला, कणकण आणि घसा बसणे यांसारख्या हिवाळ्यातील त्रासांवर लवकर आराम मिळतो. आवळ्यात आलं, खडीसाखर, मध किंवा मिरीपूड जिरेपूड यांसारखे घटक मिसळल्यास त्याची चव अधिक संतुलित होऊन पचनशक्ती वाढते.
आवळ्यापासून अनेक चविष्ट पदार्थ तयार करता येतात. मोरावळा हा आवळ्याचा सर्वात लोकप्रिय आणि आरोग्यदायी गोड पदार्थ मानला जातो. साखरेच्या पाकात मुरवलेला मोरावळा ताकद वाढवतो आणि रक्तशुद्धी करतो. आवळ्याचे लोणचे हे त्याचे आणखी एक रुचकर रुप, जे मसालेदार चवीमुळे जेवणाला रंगत आणते आणि वर्षभर आवळा खाण्याची सहज सोय होते. याशिवाय आवळा कँडी, चटणी यांसारखे पदार्थही आवळा नियमित आहारात समाविष्ट करण्याचे उत्तम पर्याय आहेत.
आवळा हा पोषणाचा खजिनाच आहे. त्यात संत्र्यापेक्षा अनेक पटीने अधिक जीवनसत्त्व सी आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती दृढ करते. आवळ्यातील अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक मुक्तरॅडिकल्स कमी करतात. फायबरमुळे पचन सुधारते, तर कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस हाडे आणि रक्तासाठी उपयुक्त ठरतात. पोटॅशियम आणि अमिनो आम्ल शरीराची पेशी कार्यक्षम ठेवतात, हृदयाच्या आरोग्याला मदत करतात. आवळा हा हिवाळ्यातील सर्वात महत्त्वाचा सुपरफूड म्हणावा असा घटक आहे. त्याची चव, गुणधर्म आणि पोषणतत्त्वे यामुळे तो थंडीत शरीराला बळ देतो, तजेलदार त्वचा देतो आणि अनेक त्रासांपासून संरक्षण पुरवतो.
