आधुनिक काळात प्लास्टिकच्या बॉटलचा वापर खूप सामान्य झाला आहे. घरी असो, ऑफिसमध्ये असो किंवा प्रवासात असो, बहुतेक लोकांना प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणं सोपं आणि सोयीस्कर वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का की, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणं हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, प्लास्टिकमध्ये असलेले काही धोकादायक केमिकल्स शरीरात प्रवेश करू शकतात आणि हार्ट ॲटॅक आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढवू शकतात.
प्लास्टिकच्या बॉटलमुळे हार्ट ॲटॅकचा धोका कसा वाढतो?
प्लास्टिकच्या बॉटलमध्ये बीपीए आणि फॅथलेट्स असतात, जे शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करतात, ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं, जे हार्ट ॲटॅकचं एक प्रमुख कारण आहे. याशिवाय प्लास्टिक केमिकल्समुळे शरीरात जळजळ वाढू शकते आणि धमन्या आकुंचन पावू शकतात, शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा येतो, ज्यामुळे हार्ट ॲटॅक येऊ शकतो.
काही रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, बीपीएच्या संपर्कात आल्याने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल (एलडीएल) वाढू शकतं आणि गुड कोलेस्ट्रॉल (एचडीएल) लेव्हल कमी होऊ शकते, ज्यामुळे हार्ट ॲटॅचा धोका वाढतो. एवढंच नाही तर प्लास्टिकमध्ये असलेले केमिकल्स शरीरात फ्री रॅडिकल्सचे प्रमाण वाढवतात, ज्यामुळे सेल्सचं नुकसान होतं आणि हृदयावर वाईट परिणाम होतो.
असा करा बचाव
- पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बॉटलऐवजी काचेच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या बॉटलचा वापर करा.
- जर तुम्ही प्लास्टिकची बॉटल वापरत असाल तर BPA-फ्री बॉटल खरेदी करा आणि त्यांचं लेबल तपासा.
- सतत वापर केलेल्या प्लास्टिकच्या बॉटल कालांतराने अधिक धोकादायक बनू शकतात. म्हणून त्यांचा वारंवार वापर टाळा.
- प्लास्टिकच्या बॉटलमध्ये गरम पाणी भरल्याने किंवा बॉटल उन्हात ठेवल्याने केमिकल लीचिंग वाढते, हे टाळलं पाहिजे.
- घराबाहेर पडण्यापूर्वी स्टील किंवा काचेची पाण्याची बाटली सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला बाहेर प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी प्यावं लागणार नाही.