हिवाळ्यात किंवा सतत कोरड्या हवामानामुळे त्वचा इतकी कोरडी पडते की ती झोंबू लागते. तोंड उघडताना ओठांच्या बाजूला आग होणे, त्वचा ताणली गेल्यासारखी वाटणे, कधी कधी तिथे भेगा पडणे आणि त्या भागाची त्वचा हळूहळू काळपट होणे हा त्रास दिसायला छोटा वाटतो, पण दुर्लक्ष केल्यास तो वाढत जातो. हा त्रास केवळ बाह्य कारणांमुळेच नाही, तर शरीरातील काही अंतर्गत असंतुलनामुळेही होऊ शकतो.
या त्रासामागचे सर्वात सामान्य कारण म्हणजे त्वचेतील ओलावा कमी होणे. थंडी, कोरडी हवा, वारंवार गरम पाण्याने चेहरा धुणे किंवा खूप फेसाळ साबणांचा वापर केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. त्यामुळे ओठांच्या आजूबाजूची त्वचा लवकर कोरडी पडते, कारण हा भाग आधीच नाजूक असतो.
पाण्याचे अपुरे सेवन हेही एक मोठे कारण आहे. शरीराला आतून पाणी कमी मिळालं की त्याचा परिणाम सर्वात आधी ओठांवर आणि तोंडाच्या कडांवर दिसतो. ओठ वारंवार चाटण्याची सवय, कोरड्या ओठांवर दात लावणे किंवा सतत हात लावणे यामुळेही ही त्वचा जास्त संवेदनशील होते.
काही वेळा हा त्रास व्हिटॅमिन B-कॉम्प्लेक्स, लोह किंवा झिंकच्या कमतरतेमुळे होतो. त्यामुळे ओठांजवळ आग होणे, सूज येणे, त्वचा फुटणे आणि काळपटपणा दिसणे, आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर हा त्रास वात वाढल्यामुळे होणाऱ्या कोरडेपणासोबत थोड्या पित्ताच्या उष्णतेमुळेही वाढतो.
तोंड उघडतानाही आग होण्याचं कारण म्हणजे त्या भागात आलेल्या सूक्ष्म भेगा. त्या भेगांमधून त्वचा ताणली गेल्यावर जळजळ होते. सततची जळजळ आणि कोरडेपणा राहिल्यास त्या भागाची त्वचा जाड आणि काळी पडू लागते.
या त्रासावर उपाय करताना आधी आतून शरीराला ओलावा आणि पोषण देणे गरजेचे आहे. दिवसातून पुरेसे पाणी पिणे, आहारात तूप, तेलकट पण पचायला हलके पदार्थ, दूध, ताक, सूप यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. वात वाढू नये म्हणून फार कोरडे, थंड आणि जास्त तिखट पदार्थ कमी करावेत.
चेहऱ्याला सतत मॉइश्चराइझर लावणे फार गरजेचे असते. तसेच विविध औषधेही मिळतात. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार चेहऱ्याला क्रिम्स लावा. कारण हे काळे डाग कायम स्वरुपीही असतात. ते जर तसेच राहीले तर चेहरा काळवंडलेला दिसायला लागतो.
