Hot Water Vs Weight Loss : हेल्थबाबतचे वेगवेगळे ट्रेंड सोशल मीडियावर बघायला मिळतात. त्यात वजन, वाढलेलं पोट, वाढलेली चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय हेल्थ एक्सपर्ट सांगत असतात. कुणी सांगतं जिरे पाणी प्या, कुणी सांगतं लिंबू पाणी प्या तर कुणी हळदीचं पाणी पिण्याचा सल्ला देतात. जास्तीत जास्त लोक सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. त्यांचा दावा असतो की, रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि मग वजन. बरं हा उपाय सोपा वाटत असल्याने जास्तीत जास्त लोक हा उपाय फॉलो करतात. पण खरा प्रश्न असा आहे की, गरम पाणी प्यायल्याने खरंच फायदे होतात का, वजन कमी होतं का, की हा फक्त आणखी एक व्हायरल ट्रेंड आहे? सत्य थोडं वेगळं आहे. गरम पाणी पिणं सुरक्षित आहे आणि अनेकांना त्यामुळे बरं वाटतं, पण यामागे ठोस वैज्ञानिक पुरावे स्पष्टपणे सिद्ध झालेले नाहीत.
यामुळे खरंच फायदा होतो का?
प्रत्यक्षात, फायदे पाण्याच्या तापमानापेक्षा तुम्ही नियमितपणे पाणी पिण्याच्या सवयीशी अधिक संबंधित असतात. गरम पाण्यामुळे मिळणारी उब आणि रिलॅक्सेशन शरीराला थोडा आराम देऊ शकतं. म्हणजेच खरा फायदा पाणी पिण्यात आहे, ते गरम असण्यात नाही. पुरेसं पाणी पिणं पचनक्रिया, ब्लड सर्कुलेशन, किडनीचं कार्य आणि ब्लड प्रेशर यांसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियांना सुरळीत ठेवतं. काही संशोधनात असंही दिसून आलं आहे की कमी पाणी प्यायल्यास दैनंदिन ताण सांभाळणं कठीण होऊ शकतं.
गरम पाण्याने वजन कमी होतं का?
सर्वात कॉमन दावा म्हणजे गरम पाणी वजन कमी करतं का? obesity जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, सध्या तरी असा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही की फक्त गरम पाणी पिऊन वजन कमी होतं. मात्र, जर तुम्ही साखरयुक्त किंवा जास्त कॅलरी असलेल्या पेयांऐवजी पाणी पिण्यास सुरुवात केली, तर वजन नियंत्रणात ठेवायला मदत होऊ शकते. काही अभ्यासांनुसार गरम पाणी आतड्यांची हालचाल थोडी वाढवू शकतं, ज्यामुळे पचन सुधारू शकतं. पण हा परिणाम खूपच मर्यादित असतो आणि थेट फॅट कमी होण्याशी त्याचा संबंध नाही.
घशाच्या खवखवीत उपयोगी
घशातील खवखवीबाबत मात्र गरम पाणी थोडं अधिक फायदेशीर ठरतं. गरम द्रव पदार्थ घशाला आराम देतात, म्युकस सैल करतात आणि श्वसनमार्गातील जळजळ कमी करतात. म्हणूनच सर्दी-खोकल्यात गरम चहा किंवा काढा पिण्याचा सल्ला दिला जातो.
कोमट पाणी पिण्याचे फायदे?
आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, उपाशीपोटी कोमट पाणी प्याल तर शरीराची जठराग्नि म्हणजे पचनासाठी आवश्यक अग्नि सक्रिय होते. रात्रभर शरीर आराम करत असतं, तेव्हा पचन तंत्र सुस्तीच्या स्थितीत जातं. अशात हलक्या कोमट पाण्याने ते पुन्हा सक्रिय होतं. ज्यामुळे अन्न पचनाची प्रक्रिया योग्य पद्धतीने होते. तसेच गॅस, बद्धकोष्ठता, अपचन अशा समस्याही दूर होतात. इतकंच नाही तर कोमट पाण्याने कफ दोषही संतुलित होते.
