वरण- भातासाठी डाळ- तांदूळ असणारं कुकर गॅसवर चढवूनच कित्येक घरांमध्ये स्वयंपाकाची सुरुवात होते. आता हेच कुकर आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. कुकरमध्ये शिजवलेले डाळ, तांदूळ खाण्यापेक्षा पातेल्यात झाकण न ठेवता शिजवलेली डाळ आणि भात खावा, असा सल्लाही देण्यात येतो. आता तांदूळ पातेल्यामध्ये चटकन शिजतात. पण वरणासाठीची डाळ शिजायला मात्र खूप वेळ लागतो. त्यामुळे कित्येकजणी ते टाळतात आणि सरळ कुकरमध्ये डाळ शिजायला टाकतात. पण अशा पद्धतीने शिजवलेली डाळ खाणं आरोग्यासाठी हानिकारक असेल का, असा प्रश्नही त्यावेळी त्यांच्या डोक्यात येतोच..(correct method of cooking dal in pressure cooker) म्हणूनच तुमच्या या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळविण्यासाठी डॉक्टरांनी शेअर केलेली ही माहिती एकदा बघाच...(does cooking dal in pressure cooker is really harmful?)
कुकरमध्ये डाळ शिजवणं खरंच आरोग्यासाठी हानिकारक आहे का?
असं म्हटलं जातं की डाळ शिजवताना जो पाण्यावर फेस येतो तो काढून टाकला पाहिजे. याचसाठी डाळ पातेल्यात शिजवायला हवी. कारण तो फेस चांगला नसतो. याविषयी कॅन्सर सर्जन डॉ. जयेश सांगतात की तो फेस म्हणजे प्रोटीन्स, थोडंसं स्टार्च आणि सॅपोनिन नावाचं एक कम्पाउंड असतं.
हे कम्पाउंड जर जास्त प्रमाणात खाल्लं तर ते पोटासाठी त्रासदायक ठरतं. पण त्यासाठी डाळ पातेल्यातच शिजवायला हवी असं मात्र मुळीच नाही. उलट त्यासाठी प्रेशर कुकर हाच सर्वात चांगला पर्याय आहे. कारण कुकरमध्ये तापमान जास्त असतं. त्यामुळे डाळीमधल्या कॉम्प्लेक्स शुगरचं आणि सॅपोनिनचं व्यवस्थित ब्रेकडाऊन होतं आणि डाळीमधले पौष्टिक घटक खूप चांगल्या प्रकारे ॲक्टीव्ह होतात.
डाळ शिजविण्याची योग्य पद्धत कोणती?
डाळीमध्ये असणारे सॅपोनिन आणि कॉम्प्लेक्स शुगर यांचा आरोग्याला त्रास होऊ नये म्हणून डाळ शिजविण्याची योग्य पद्धत कोणती याविषयीची माहितीही डॉक्टरांनी शेअर केली आहे. ते सांगतात की कोणतीही डाळ शिजविण्यापुर्वी २ ते ३ वेळा हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्या.
यानंतर ती एखादा तास पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्यानंतर कुकरमध्ये अगदी मऊ शिजवून घ्या. या पद्धतीने कुकरमध्ये शिजवलेली डाळ आरोग्यासाठी अजिबातच हानिकारक नाही, असं डॉक्टर सांगतात.
