अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण इतर करतात म्हणून योग्य समजून आपणही करतो. जसे की तळणीचे पदार्थ ठेवायला वृत्तपत्राचा वापर करणे. घरोघरी असे केले जाते. गरम पक्वान्न, वडे, भजी, पापड किंवा पकोडे यांसारखे पदार्थ तळल्यानंतर थेट वर्तमानपत्रावर ठेवले जातात. वर्तमानपत्राचे विविध वापर केले जातात, त्यापैकी एक वापर हा ही. परंतु हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरु शकते. (Do you immediately place hot fried foods on newspaper? Is it good to do this or can it be harmful to your health?)कारण वर्तमानपत्रावर छापलेली शाई केवळ वाचण्यासाठी असते, ती अन्नाच्या संपर्कात येण्यास योग्य नसते. या शाईत लीड, कॅडमियम, कार्बन ब्लॅक आणि मिनरल ऑईल यांसारखे रासायनिक घटक असतात. हे घटक गरम तेलकट पदार्थांच्या संपर्कात आल्यावर अन्नात मिसळतात आणि शरीरात गेल्यावर त्याचा त्रास होतो. शरीरासाठी ते वाईट ठरते.
अशा प्रकारची दूषित शाई शरीरात गेल्यास पचनसंस्था बिघडणे, यकृतावर (लिव्हरवर) ताण येणे, हार्मोन्समध्ये बिघाड होणे, त्वचेवर पुरळ येणे आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या इतरही काही आजारांचा धोका वाढतो. असे परिणाम होऊ शकतात. विशेषतः मुलं आणि वृद्ध व्यक्ती यांना याचा जास्त धोका असतो.
वर्तमानपत्रातील शाईत वापरले जाणारे रासायनिक रंग पदार्थ उष्णतेमुळे अधिक वेगाने पदार्थात मिसळतात. तसेच या शाईत जीवाणू (बॅक्टेरिया) आणि धूळसुद्धा असते, जी अन्न दूषित करते. त्यामुळे अशा अन्नामुळे अन्नविषबाधा (फूड पॉइझनिंग) होण्याची शक्यता वाढते.
त्याऐवजी तळलेले पदार्थ ठेवण्यासाठी टिश्यू पेपर, बटर पेपर, स्वच्छ कापड, स्टीलची चाळणी किंवा किचन टॉवेल वापरावा. हे पदार्थातील जास्तीचे तेल शोषून घेतात आणि आरोग्यास हानी पोहोचवत नाहीत.
एकंदरीत, वर्तमानपत्र अन्न ठेवण्यासाठी नव्हे तर वाचण्यासाठी असते. थोड्या सोयीसाठी वापरलेले न्यूजपेपर दीर्घकाळात आरोग्यावर गंभीर परिणाम करु शकतात. त्यामुळे अशी सवय लगेच सोडावी आणि स्वच्छ, सुरक्षित पर्यायांचा वापर करावा. आरोग्यासाठी हानिकारक ठरणाऱ्या गोष्टी न केलेल्याच योग्य.