Healthy Tips: काही खाल्ल्यावर पोट फुगण्याची समस्या होत असल्यानं भरपूर लोक वैतागलेले असतात. पोट फुगेल की काय या भीतीनं आवडीचे पदार्थही अनेकदा खाता येत नाही. पोट फुगण्यासोबतच पोटातून गुडगुड आवडही येऊ लागतो. तसेच पोटात गॅसही होतो. ज्यामुळे अधिकच अस्वस्थ वाटतं. ना कामात लक्ष लागत, ना एकाजागी शांतपणे बसता येत. तुम्हाला ब्लोटिंग म्हणजेच पोट फुगण्याची समस्या नेहमीच होत असेल तर यावर आम्ही तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत.
योगा ट्रेनर आणि हेल्थ इंस्ट्रक्टर अंशुका परवानी (Anshuka Parwani) यांच्या क्लाएंट लिस्टमध्ये दीपिका पादुकोन, आलिया भट्ट, करिना कपूर अशा सेलिब्रिटींचा समावेश आहे. त्यांनीच पोट फुगण्याची समस्या दूर करण्यावर एक नॅचरल आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. त्यांनी यासाठी एक हर्बल टी पिण्याचा सल्ला दिलाय.
ब्लोटिंग दूर करणारी हर्बल टी
अंशुका सांगतात की, या आयुर्वेदिक टी मध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. ज्यामुळे पोटाला आराम मिळू शकतो. त्या सांगतात की, ब्लोटिंगची समस्या होऊ नये म्हणून त्या रोज सकाळी ही हर्बल टी पितात.
हर्बल टी करण्यासाठी आल्याचा एक छोटा तुकडा, एक छोटा तुकडा दालचीनी, वाळलेल्या आल्याचं पावडर, काही तुळशीची पाने, ३ काळी मिरी, एक चमचा वाळलेला ऑरिगॅनो, २ बारीक केलेल्या वेलची, १-२ लसणाच्या कळ्या, एक चमचा बडीशेप आणि चिमूटभर ओव्यासोबत अर्धा चमचा हळद घ्या. यासाठी तुम्हाला एक चमचा मधही लागेल.
या सगळ्या गोष्टी एकत्र करा आणि २ ते ५ मिनिटांसाठी चांगल्या उकडू द्या. नंतर हे गाळून एका कपात टाका. तुमची हर्बल टी तयार आहे. ज्यानं तुमच्या पोटाला आराम मिळू शकेल.
इतरही काही उपाय
ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही बडीशेपचं पाणी सुद्धा पिऊ शकता किंवा बडीशेप खाऊन वरून पाणी प्या. यानं तुम्हाला आराम मिळू शकेल.
तसेच जिऱ्याचं पाणी सुद्धा ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं.
ओवा सुद्धा पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर मानला जातो.