हॉलिवूडची प्रसिद्ध मॉडेल आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार कोर्टनी कार्दशियन तिच्या नवीन आणि वादग्रस्त उत्पादनामुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आली आहे. कोर्टनीच्या 'Lemme' या ब्रँडने योनीच्या चांगल्या आरोग्यासाठी 'Lollipop for Vagina' हे बाजारात आणलं आहे. मात्र या उत्पादनावर आरोग्य तज्ज्ञांनी आणि डॉक्टरांनी तीव्र आक्षेप घेतला असून महिलांच्या आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकतं असा गंभीर इशारा देखील दिला.
काय आहे 'लॉलीपॉप फॉर व्हजायना'?
कोर्टनी कार्दशियनने सोशल मीडियावर या नवीन उत्पादनाची घोषणा केली. हे पहिल्यांदा झालेलं नाही, याआधी देखील तिने चांगल्या केसांसाठी, त्वचेसाठी, नखांसाठी नवनवीन उत्पादनं आणली आहेत. लॉलीपॉप फॉर व्हजायना हे योनीचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं. याची चवही गोड आहे. यामध्ये अननस आणि व्हिटॅमिन सी सारख्या घटकांचा वापर केल्याचा दावा कंपनीने केला आहे.
आरोग्य तज्ज्ञांचा मोठा आक्षेप
या 'चमत्कारी' उत्पादनाच्या दाव्यावर जगभरातील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञांनी कठोर शब्दांत टीका केली आहे. मुद्दाम लक्ष वेधून घेण्यासाठी ती सर्व करत असल्याचं म्हटलं आहे. हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. यामुळे योगीचं आरोग्य सुधारतं याबाबत कोणताही पुरावा डॉक्टरांना मिळालेला नाही. त्यांनी हा स्कॅम असल्याचं म्हटलं आहे.
तज्ज्ञांच्या मते योनीमध्ये स्वतःची स्वच्छता करण्याची आणि आवश्यक पीएच लेव्हल राखण्याची नैसर्गिक प्रक्रिया असते. बाहेरून अशा पदार्थांचे सेवन केल्याने हा नैसर्गिक समतोल बिघडू शकतो. अशा प्रकारच्या उत्पादनांमुळे योनीमार्गात यीस्ट इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञांनी याला महिलांना अनावश्यक आणि हानिकारक उत्पादनं विकण्याची 'मार्केटींग युक्ती' असं म्हटलं आहे.
डॉक्टरांनी केलं आवाहन
डॉक्टरांनी महिलांना आवाहन केलं आहे की, योनीच्या आरोग्याबद्दल कोणत्याही प्रकारची चिंता वाटत असेल किंवा काही समस्या जाणवत असतील, तर अशा जाहिरात केलेल्या उत्पादनांवर विश्वास न ठेवता थेट स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. नैसर्गिकरित्या शरीर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याचे सोपे उपाय उपलब्ध असताना अशा वादग्रस्त आणि अनैसर्गिक उपायांपासून दूर राहणं अधिक सुरक्षित आहे.
अशी घ्या काळजी
स्वच्छता - योनी आणि आजुबाजुचा भाग स्वच्छ ठेवण्यासाठी पाणी वापरा. साबण किंवा इतर केमिकल्स वापरू नका.
आहार - योग्य आहार घ्या. फायबर, प्रोबायोटिक्स आणि व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ खा.
पाणी- भरपूर पाणी प्या, कारण ते योनीमार्गातील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करतं.
व्यायाम - नियमित व्यायाम केल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं
कपडे - सुती आणि आरामदायक अंडरवेअर वापरा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही.
मासिक पाळीच्या दिवसात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.
