शरीरातील चरबी वाढते तेव्हा ती फक्त पोटावरच नव्हे तर पायांच्या खालच्या भागात, म्हणजेच पोटऱ्यांभोवतीही साचू लागते. ही चरबी दिसायलाही त्रासदायक आणि आरोग्यासाठीही हानिकारक ठरते. (calf fat can be danger, risk of serious diseases, try some easy remedies and stay fit and healthy )जीवनशैली, चुकीचा आहार आणि हालचालींचा अभाव यामुळे हा त्रास उद्भवतो. तसेच सतत बसून राहणे किंवा सतत उभे राहणे या दोन्ही क्रियांचा त्रास होतो.
जास्त वेळ खुर्चीवर बसून काम केल्यामुळे रक्ताभिसरण मंदावते. त्यामुळे पायाच्या भागात चरबी आणि पाणी साचते. जास्त मीठ, साखर आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यानेही शरीरात चरबी वाढते. काही महिलांमध्ये हार्मोन्सच्या बदलामुळे, गर्भधारणेनंतर किंवा पाळीमुळेही पोटऱ्यांवर चरबी साठते. अनुवंशिकता आणि झोपेची कमतरता ही कारणे ठरु शकतात. ही चरबी वेळेत कमी केली नाही तर पाय सुजणे, जड होणे, चालताना थकवा येणे अशा समस्या निर्माण होतात. पुढे शिरा फुगण्याचा त्रास (व्हेरिकोस व्हेन्स) होऊ शकतो. गुडघे आणि टाचांवर ताण येऊन सांधेदुखी वाढते. काही वेळा लठ्ठपणामुळे मधुमेह आणि रक्तदाबाचाही धोका वाढतो.
पोटऱ्यांभोवतीची चरबी कमी करण्यासाठी आहारात सुधारणा करणे आवश्यक आहे. रोजच्या जेवणात फळं, भाज्या, डाळी आणि हलकं अन्न खावं. साखर, मीठ आणि तळलेले पदार्थ टाळावेत. दिवसाला भरपूर पाणी प्यावं, कारण शरीरातील पाणी साचू नये यासाठी ते आवश्यक आहे.
व्यायाम ही सर्वात प्रभावी गोष्ट आहे. रोज ३० ते ४५ मिनिटं चालणे, सायकल चालवणे, स्किपिंग करणे यामुळे पायातील चरबी कमी होते. योगासने करा. ताडासन, उत्तानासन आणि कॅल्फ रेजेस पोटऱ्यांसाठी विशेष फायदेशीर आहेत. झोपताना पाय थोडे उंचावर ठेवले तर सूज कमी होते. गरम पाण्यात पाय बुडवायचे आणि हलका मसाज करायचा त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. पुरेशी झोप आणि ताणमुक्त जीवनही तितकेच महत्त्वाचे आहे. रात्रीची चांगली झोप हार्मोन्स संतुलित ठेवते आणि चरबी साचण्याची प्रवृत्ती कमी करते.
