Symptoms of Brain Stroke : जर वेळेवर लगेच उपचार मिळाले नाही तर ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) ही एक जीवघेणी स्थिती होते. वेळेवर जर उपचार मिळाले नाही तर ब्रेन डॅमेजचाही धोका असतो, ज्यामुळे व्यक्त कोमात जाऊ शकते किंवा त्याना पॅरालिसिसही होऊ शकतो. त्यामुळे याच्या काही संकेतांकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं.
ब्रेन स्ट्रोक अचानक येऊ शकतो. म्हणजे स्ट्रोक कोणताही संकेत न देताही आपण याचे शिकार होऊ शकतो. पण बऱ्याचदा स्ट्रोकच्या आधी शरीर आपल्याला काही संकेत देतं. या लक्षणांकडे जर वेळीच लक्ष दिलं तर वेळीच उपचार करून जीव वाचवला जाऊ शकतो. अशात पाहुयात ब्रेन स्ट्रोकच्या आधी शरीरात दिसणारी काही लक्षणं...
अचानक डोकं दुखणे
स्ट्रोकच्या आधी अनेकांचं डोकं अचानक दुखू लागतं, हे दुखणं सामान्य दुखण्यापेक्षा वेगळं असतं. डोकं फार जास्त दुखतं आणि कोणत्या कारणाशिवाय अचानक दुखू लागतं. जर कोणत्याही कारणाशिवाय डोकं जास्त दुखत असेल तर डॉक्टरांना दाखवा.
चक्कर येणे किंवा संतुलन बिघडणे
अचानक चक्कर येणे, चालताना संतुलन बिघडणे किंवा बॅलन्स कायम ठेवण्यात अडथळा हे स्ट्रोक येण्यात संकेत असू शकतात. या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं.
डोळ्यांनी धुसर किंवा डबल दिसणे
स्ट्रोकच्या आधी बऱ्याच लोकांना डोळ्यांनी दिसण्याची समस्या होते. एका किंवा दोन्ही डोळ्यांनी धुसर दिसू लागतं, समोरच्या गोष्टी डबल दिसू लागतात किंवा काही सेकंदासाठी दिसणं बंद होणं स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. जर या गोष्टी पुन्हा पुन्हा होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
भ्रम किंवा कमी स्मरणशक्ती
काही केसेसमध्ये स्ट्रोकच्या आधी व्यक्तीला भ्रम होऊ लागतो किंवा ते छोट्या छोट्या विसरू लागतात. वेळ, ठिकाणं किंवा लोकांना ओळखणं अवघड होतं. ही लक्षणं अल्झायमर किंवा डिमेंशियासारखा वाटू शकतात. पण जर या गोष्टी अचानक होत असतील तर स्ट्रोकचा संकेत असू शकतात
लक्षणं दिसल्यावर काय कराल?
स्ट्रोकची ही लक्षणं दिसल्यावर ती कमी होण्याची वाट बघू नका. स्ट्रोकच्या स्थितीत एक एक सेकंद महत्वाचा असतो. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. जर आपल्याला किंवा आपल्या आजूबाजूला कुणाला ही लक्षणं दिसत असतील तर लगेच मदत घ्या. वेळीच उपचार मिळाले तर जीव वाचू शकतो.