Join us

आषाढी एकादशी : पाऊस, गारठा आणि उपवास, आवर्जून खा ४ पदार्थ, राहाल दिवसभर एनर्जेटीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2023 11:18 IST

Ashadhi Ekadashi Upwas Fasting Diet Tips : उपवास असूनही एनर्जी जास्त काळ टिकून राहायला हवी तर आहाराची काय काळजी घ्याल...

पावसाळा आला की एरवीच आपल्याला फळं, पालेभाज्या, दही यांसारखे पदार्थ खाण्याबाबत शंका उपस्थित होतात. या काळात अग्नी मंद झाल्याने पचनशक्ती नकळतच कमी झालेली असते. अशावेळी खाल्लेले नीट पचत नाही. तसेच पावसामुळे अपचन होण्याचीही शक्यता जास्त असते. पाण्यातून तसेच पालेभाज्या आणि फळांतून या काळात विविध संसर्ग होऊ शकतात. मात्र तरीही तब्येत चांगली ठेवायची तर आपल्याला ताजे, पौष्टीक पदार्थ खावेच लागतात. त्यात आषाढी एकादशीचा उपवास आला की काय करायचे आणि खायचे असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो. उपवासाला खाल्ला जाणारा साबुदाणा, बटाटा, दाणे या गोष्टी वातूळ आणि पित्ताला कारणीभूत ठरतात. अशावेळी उपवासाला आवर्जून खायला हवेत असे ४ पदार्थ कोणते ते पाहूया (Ashadhi Ekadashi Upwas Fasting Diet Tips)...

(Image : Google)

१. राजगिरा

उपवासाला आवर्जून खायला हवा असा हा घटक. यामध्ये लोह आणि इतरही शरीराला पोषण देणारे घटक जास्त प्रमाणात असल्याने राजगिरा आपण विविध स्वरुपात खाऊ शकतो. राजगिऱ्याच्या लाडू किंवा वड्यांबरोबरच राजगिऱ्याच्या लाह्या ताक घालून किंवा राजगिऱ्याच्या पीठाचे थालिपीठ, वडे असे पदार्थही अतिशय छान लागतात. 

२. खजूर आणि सुकामेवा 

खजूरातून शरीलाला लोह, ऊर्जा आणि इतरही अनेक घटक मिळतात. त्यामुळे नुसत्या खजूराच्या बिया, खजूराचे लाडू किंवा वडी, खजूराची खीर, स्मूदी असे बरेच प्रकार करता येतात. याबरोबरच सुकामेवाही आपण भिजवून, रताळं, बटाटा किंवा साबुदाण्याच्या खिरीत घालून खाऊ शकतो. सुकामेव्याचे लाडूही करता येतात. 

३. ताक, सरबत

उपवासाच्या दिवशी काही वेळा आपल्याकडून तेलकट, वातूळ पदार्थ खाल्ले जातात. पावसाळी हवा असल्याने पाणीही कमी प्यायले जाते. अशावेळी दही खायला नको वाटते. मग ताक, लिंबू सरबत, कोकम सरबत अशी सरबते आपण आवर्जून घेऊ शकतो. शहाळं पाणी किंवा फळांचा ज्यूसही घेतला तरी एनर्जी येण्यास मदत होते. 

४. दूध 

बाहेर पाऊस असला की आपण नकळत चहा किंवा कॉफी घेतो. मात्र त्यामुळे एकतर भूक मरते आणि चहा-कॉफी सतत घेण्याने अॅसिडीटी होण्याचीही शक्यता असते. त्यापेक्षा आपण कोमट दूध घेऊ शकतो. यामध्ये आवडीनुसार राजगिरा, गुलकंद, गूळ असे काहीही घातले तरी चालते. शक्य असेल तर सुकामेव्याची पावडर करुन घातल्यासही एनर्जी येण्यास मदत होते.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआषाढी एकादशीआहार योजना