Health Tips : भारतात भरपूर घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. काही लोक हे पाणी फिल्टर करून वापरतात तर काही लोक फिल्टर न करता पितात. अलिकडेच कोलंबिया विश्वविद्यालयात करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, अमेरिकेतील नळाच्या पाण्यातील आर्सेनिक नावाचं विषारी तत्व महिलेच्या गर्भात वाढत असलेल्या बाळासाठी खूप नुकसानकारक ठरू शकतं. रिसर्चनुसार, भलेही पाण्यात आर्सेनिकचं प्रमाण कमी असेल, पण तरी सुद्धा ते गर्भवती महिला आणि त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी घातक ठरू शकतं.
अमेरिकेत साधारण २८ कोटी लोक सार्वजनिक पाणी पुरवठा व्यवस्थेवर अवलंबून आहे. अशात बऱ्याच लोकांचा जीव धोक्यात आहे. या रिसर्चनुसार, नळाचं पाणी पूर्णपणे सुरक्षित असल्याचं मानता येत नाही. खासकरून गर्भवती महिला आणि लहान मुलांचा विषय येतो तेव्हा. अशात सगळ्यांनीच या समस्येवर लक्ष देण्याची गरज आहे.
काय आहे आर्सेनिक?
आर्सेनिक एक विषारी तत्व आहे, जे जमिनीत असतं. खासकरून डोंगराळ भाग आणि मातीमध्ये नॅचरल रूपानं आढळतं. हे मातीमधून पाण्यात मिक्स होऊ शकतं. जे नंतर नळाच्या पाण्यात येतं. अमेरिकेतील सगळ्याच ५० राज्यांतील सार्वजनिक पाणी पुरवठा व्यवस्थेत आर्सेनिक आढळून आलं आणि अंदाज आहे की, यानं २० कोटी लोक प्रभावित होऊ शकतात.
आर्सेनिक घातक कसं?
आर्सेनिक गर्भवती महिला आणि नवजात बाळांसाठी घातक असतं. रिसर्चमध्ये आढळून आलं की, पाण्यात आर्सेनिक थोडं तरी असलं तरी वेळेआधीच बाळाचा जन्म होण्याचा धोका होऊ शकतो. यामुळे कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ शकतं. तसेच या बाळांना आयुष्यभर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.
आर्सेनिकचं किती प्रमाण सुरक्षित?
अमेरिकेतील पर्यावरण सुरक्षा संस्थेनुसार, पाण्यात आर्सेनिकचं जास्तीत जास्त १० मायक्रोग्रॅम प्रति लीटर प्रमाण सुरक्षित मानलं जातं. पण या रिसर्चमध्ये आढळून आलं आहे की, केवळ ५ मायक्रोग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी आर्सेनिक सुद्धा बाळांसाठी नुकसानकारक ठरू शकतं.
कसा करावा बचाव?
एक्सपर्टस सांगतात की, पब्लिक हेल्थ प्रोटेक्शनसाठी नळाच्या पाण्यातील आर्सेनिकच्या प्रमाणाबाबत जी सीमा सरकारनं ठरवली आहे, ती आणखी कमी केली पाहिजे. जेणेकरून आरोग्य बिघडू नये. नळाचं पाणी नेहमी चेक केलं पाहिजे. खासकरून गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी फिल्टरच्या पाण्याचा वापर केला पाहिजे.