दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीची चांगली झोप आणि खाल्लेल्या अन्नपदार्थांचं योग्य रीतीने पचन होणं, या दोनच गोष्टी महत्वाच्या वाटतात. खरंतर, या दोन्ही गोष्टी चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. रात्रीची वेळ (4 Things You Should Not Do Before Sleeping) ही आपल्या शरीरासाठी विश्रांतीची आणि शरीराच्या दुरुस्तीसाठीची असते. असे असले तरी, काही चुकीच्या सवयींमुळे झोपेची गुणवत्ता खराब होते आणि पचनसंस्थाही बिघडते, असे हार्वर्ड विद्यापीठातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ सेठी यांचे मत आहे(4 Things to Avoid Before Bed to Improve Sleep Quality & Digestion).
रात्रीच्या झोपण्यापूर्वी आपल्या काही सवयी या अशा असतात ज्यामुळे आपली झोप बिघडून पचनक्रिया देखील खराब होते. या सवयी दुर्लक्षित केल्यास दीर्घकालीन आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. डॉक्टरांच्या मते, जर या चुकीच्या सवयी वेळेत थांबवल्या नाहीत, तर त्याचा परिणाम आपले पचन, मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि एकंदर संपूर्ण आरोग्यावर होऊ शकतो. यासाठीच, नेमक्या त्या कोणत्या ४ सवयी आहेत ते पाहूयात(4 Things You Should Never Do At Night Can Negative Effect On Digestion & Sleep Quality).
रात्री झोपण्यापूर्वी करु नका या ४ चुका...
१. झोपण्यापूर्वी पचायला जड अन्नपदार्थ खाणे :- जर रात्रीच्या जेवणात पचायला जड व तेलकट, तुपकट पदार्थ खाल्ले, तर त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारचे जेवण केल्याने पचनक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो, शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते आणि झोपेची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास आधी रात्रीचे जेवण संपवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि चांगली झोप लागण्यास मदत होते.
चुकूनही ‘या’ ७ भाज्या शिजतांना पाणी घालू नका, करा वाफेवर! नाहीतर भाजी होईल बेचव...
२. फोनवर सतत स्क्रोल करणे :- आजकाल बहुतेक लोकांना झोपण्यापूर्वी काही मिनिटे तरी मोबाईल वापरण्याची सवय लागली आहे. पण ही सवय आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. कारण मोबाईलमधून येणारा निळसर प्रकाश (Blue Light) मेलाटोनिन या झोपेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या हार्मोनच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण करतो, त्यामुळे वेळेवर आणि शांत झोप येणे कठीण होते. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आहे की झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल, लॅपटॉप यांसारखी उपकरणे बाजूला ठेवावीत.
३. झोपेच्या काही तास आधी कॅफिन पिणे :- झोपेच्या काही तास आधी चहा, कॉफी किंवा इतर कॅफिनयुक्त पेये घेत असाल, तर त्यामुळे झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो. ही सवय सतत असल्यास लक्ष केंद्रित करणे, स्मरणशक्ती आणि पचनक्रियेसुद्धा याचा वाईट परिणाम होऊ शकते. खरंतर, चहा, कॉफी किंवा इतर कॅफिनयुक्त पेये घेतल्यास ती आपल्या शरीरातून पूर्णपणे बाहेर जाण्यास बराच वेळ लागतो. किमान ७ ते ८ तासांचा कालावधी लागतोच. त्यामुळे झोपेचा त्रास होऊ नये म्हणून झोपण्याच्या वेळेपूर्वी किमान सहा तास आधी चहा, कॉफी किंवा इतर कॅफिनयुक्त पेय पिणे टाळावे.
कोरडा खोकला खूप? नागवेलीच्या पानांच्या घरगुती औषधाने ढास होते कमी, घ्या डॉक्टरांचाही सल्ला...
४. स्ट्रेस घेऊन झोपणे :- जर आपण मानसिक ताणतणावाच्या अवस्थेत झोपायला गेलात, तर त्याचा थेट परिणाम आपल्या आतड्याच्या आरोग्यावर होऊ शकतो. कारण मेंदू आणि पचनसंस्था यांचा अतिशय जवळचा संबंध असतो. जेव्हा मन तणावाखाली असतं, तेव्हा आतड्यांची कार्यक्षमताही कमी होते आणि त्यामुळे पचनाचे विविध त्रास उद्भवू शकतात. म्हणूनच झोपण्यापूर्वी स्वतःला शांत करण्यासाठी श्वसनाचे व्यायाम, ध्यान किंवा योग निद्रा यासारख्या उपायांचा वापर करणं फायदेशीर ठरते. यामुळे मन शांत राहतं आणि शरीर देखील विश्रांतीस तयार होतं.