lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Family Planning > वेगन कंडोम, सुरक्षित कुटुंबनियोजनासाठी नवा पर्याय! दिल्लीतील महिलेचे अनोखे आणि शास्त्रीय संशोधन

वेगन कंडोम, सुरक्षित कुटुंबनियोजनासाठी नवा पर्याय! दिल्लीतील महिलेचे अनोखे आणि शास्त्रीय संशोधन

महिला चुकूनही ज्या विषयाकडे फिरकणार नाहीत अशा गोष्टीचे उत्पादन करण्याचे आव्हान स्वीकारलेल्या अरुणा चावला या तरुणीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 04:45 PM2021-11-13T16:45:39+5:302021-11-13T17:05:41+5:30

महिला चुकूनही ज्या विषयाकडे फिरकणार नाहीत अशा गोष्टीचे उत्पादन करण्याचे आव्हान स्वीकारलेल्या अरुणा चावला या तरुणीचा प्रवास

Vegan condoms, a new option for safe family planning! Unique and scientific research of women in Delhi | वेगन कंडोम, सुरक्षित कुटुंबनियोजनासाठी नवा पर्याय! दिल्लीतील महिलेचे अनोखे आणि शास्त्रीय संशोधन

वेगन कंडोम, सुरक्षित कुटुंबनियोजनासाठी नवा पर्याय! दिल्लीतील महिलेचे अनोखे आणि शास्त्रीय संशोधन

Highlightsआजही भारतात केवळ ५.६ टक्के लोक गर्भनिरोधक म्हणून कंडोमचा वापर करताना दिसतात. कंडोममुळे महिलांच्या शरीरात नेमके कोणते घटक जातात याबाबत आपल्याकडे अजिबात ज्ञान नसते.

कंडोम हा आपल्याकडे काहीसा कानात बोलायचा विषय. महिलांसाठी तर याविषयावर बोलणे म्हणजे पाप असल्यासारखेच. पण एक २६ वर्षीय तरुणी या विषयावर केवळ बोलत नाही तर एक अनोखे संशोधन करते आणि आपली ही आगळीवेगळी कल्पना बाजारात आणत तिचे महत्त्वही पटवून देते. आता अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे या तरुणीचे कौतुक केले जात आहे, तर सुरक्षित कुटुंबनियोजनासाठी आवश्यक असलेल्या कंडोमचा वेगन पर्याय तिने बाजारात आणला आहे. सध्या वेगन डाएट, वेगन फूड या गोष्टींचे बरेच फॅड असताना वेगन कंडोम ही अनोखी कल्पना तिने बाजारात दाखल केली आहे. या तरुणीचे नाव आहे अरुणा चावला. कंडोम हा केवळ पुरुषांना शारीरिक संबंधादरम्यान आनंद मिळावा यासाठी नसून जोडीदारांपैकी दोघांसाठीही तो महत्त्वाचा असतो. शारीरिक संबंधांमध्ये अश्लिल दृष्टीने पाहणे योग्य नसून आरोग्याच्या दृष्टीनेही कंडोमचे महत्त्व असायला हवे असे अरुणा यांचे म्हणणे आहे.   

एड्ससारख्या आजाराचे वाढते प्रमाण आणि लॉकडाऊनच्या काळात नको असताना गर्भधारणा झालेल्या महिलांची संख्या यांमुळे कंडोमसारख्या गर्भनिरोधक साधनाचे महत्त्व वाढले आहे. कंडोम हा गर्भनिरोधक म्हणून सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय असूनही भारतात तो वापरण्याचे किंवा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारच वेगळा आहे. आजही भारतात केवळ ५.६ टक्के लोक गर्भनिरोधक म्हणून कंडोमचा वापर करताना दिसतात. पण एड्सच्या रुग्णांचे प्रमाण आणि गर्भधारणा होण्यावर नियंत्रण आणायचे असेल तर कंडोमचे गांभिर्य लक्षात घ्यायला हवे. दिल्लीमध्ये स्थायिक असलेल्या, कला आणि फॅशन कायदा विषयात काम करत असलेल्या अरुणा यांनी हाच मुद्दा लक्षात घेऊन आपले काम सुरू केले. ‘द बेटर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अरुणा यांनी आपल्या संशोधनाबाबत आणि या नव्या प्रकारच्या कंडोमबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या. 

कंडोमबाबत आपल्याकडे निराशाजनक वातावरण

अरुणा म्हणतात, या विषयावर मी दोन महिने संशोधन केले आणि त्यानंतर माझ्या असे लक्षात आले की, कंडोम या विषयाकडे प्रत्यक्ष तो विकत घेणे किंवा त्याची किंमत हा मुद्दा नसून सामाजिकदृष्ट्या त्याला मान्यता नसल्याचे लक्षात येते. तसेच दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्येही तुम्हाला कंडोम घेताना कोणी पाहिले तर काय, अशाप्रकारे लोकांच्या मनात भिती असल्याचे दिसते. ग्रामीण भागात तर या गोष्टीकडे अजिबात गांभिर्याने लक्ष दिले जात नाही. सुरक्षित लैंगिंक संबंधांबाबत फारसे काहीही केले जात नाही. त्यामुळे नको असलेल्या गर्भधारणेचा भार महिलेवर येतो. इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्चने केलेल्या अभ्यासानुसार, गर्भनिरोधक विषयाचा जास्त ताण हा महिलांवर येतो कारण अनेक कुटुंबांमध्ये आजही कुटुंबप्रमुख पुरुष असला तरी तो कुटुंबनियोजनाच्या बाबतीत मात्र म्हणावा तितका गंभीर नसतो. 


महिलेने या क्षेत्रात येणे आव्हानात्मक 

हा सगळा विचार करुनच अरुणा यांना लॉ क्षेत्रात काम करण्याऐवजी आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ पैसा मिळवण्यासाठी न करता सामाजिक बाजू असलेल्या विषयात काम करावे असे वाटले. या विचारानेच आपण कंडोमसारख्या विषयात काम करण्याचे ठरवले असे त्या म्हणतात. यादृष्टीने काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी जून २०२० मध्ये सलाड नावाने वेगन कंडोम तयार करणारी स्टार्ट अप सुरू केली. यामध्ये बिनविषारी आणि इको कॉन्शस कंडोम तयार केले जातात. यामध्ये वापरण्यात आलेले नैसर्गिक लॅटेक्स हा पदार्थ सुगंधमुक्त असतो तसेच त्याचे पॅकेजिंग पुर्नवापर करण्यायोग्य बनवलेले आहे. अरुणा यांनी कंडोमची निर्मिती करण्याच्यादृष्टीने देशभरात दौरा केला. पण आपले ध्येय लक्षात घेऊन एक महिला म्हणून या विषयात स्वत:ला सिद्ध करणे हे आव्हानात्मक होते. या विषयात आम्हाला एखाद्या महिलेशी बोलायचे नसून प्रत्येक जण तुम्ही तुमचे पती किंवा वडील यांना याविषयी बोलायला का नाही घेऊन येत असा प्रश्न विचारत असल्याचे त्या सांगतात. 

काय आहेत सलाड वेगन कंडोम ?


कंडोममुळे महिलांच्या शरीरात नेमके कोणते घटक जातात याबाबत आपल्याकडे अजिबात ज्ञान नसते. त्यावर ब्रँड, किंमत, फ्लेवर हे सगळे दिलेले असते पण त्यातील घटकांविषयी कोणतीही माहिती नसते. त्यामुळे आमच्या कंडोममध्ये नेमके कोणते घटक आहेत हे आम्ही आवर्जून नमूद केले आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर ग्राहकांना कंडोममध्ये वापरण्यात आलेले घटक, त्यांचे शरीराला होणारे फायदे यांविषयी देण्यात आले आहे. अनेकदा कंडोममध्ये प्लास्टीकसारखा घटक किंवा प्राण्यांशी निगडीत पदार्थांचा वापर केलेला असतो. पण भारत हा विविध जाती-धर्म असलेला देश असल्याने या देशात शाकाहारी लोकांचे प्रमाणही जास्त आहे. केवळ मार्केटींग किंवा लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही वेगन असे म्हणत नसून आम्ही खऱ्या अर्थाने त्या पद्धतीचे पदार्थ हा कंडोम तयार करण्यासाठी वापरले असल्याचे अरुणा सांगतात. आपल्या कंपनीच्या एकूण उत्पन्नाच्या १५ टक्के भाग हा देशातील शाळा महाविद्यालयांमध्ये लैंगिक संबंधांविषयी शिक्षण देण्यासाठी वापरण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.  

Web Title: Vegan condoms, a new option for safe family planning! Unique and scientific research of women in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.