Join us

‘प्युबर्टी ब्लाॅकर्स’, एका गोंधळलेल्या वादळाची कहाणी! वयात येणाऱ्या मुलग्यांना हार्मोनल औषधं सर्रास देणं धोक्याचं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2025 16:22 IST

आपल्या शारीरिक लिंगापेक्षा वेगळी/विरुद्ध, मानसिक लैंगिक ओळख जाणवणाऱ्या गोंधळलेल्या मुलांमध्ये ‘प्युबर्टी ब्लाॅकर्स’चा अनिर्बंधित, सर्रास वापर करावा का?

ठळक मुद्दे कुठल्याही औषधाचा स्वत:च्या डोक्याने स्वत:वर किंवा आपल्या मुलांवर प्रयोग करू नये.

- डाॅ. सुनील गोडबोले, (बालविकासतज्ज्ञ)

नुकतीच एक ‘वेगळी’ बातमी वाचायला मिळाली. इंग्लंडमध्ये १८ वर्षांखालील लैंगिक ओळखीच्या संदर्भात गोंधळ / अस्वस्थता (जेंडर डिस्फोरिया) असलेल्या मुलांसाठी ‘प्युबर्टी ब्लाॅकर्स’ (पौगंडावस्था थांबवणाऱ्या) औषधांच्या वापरावर बंदी घातली गेलीय! त्यावर कुठल्याही विषयावर भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेला इलाॅन मस्क यांचे ट्विट लगेचच व्हायरल झाले. इलाॅन मस्क यांच्या १२ मुलांपैकी एक मुलगा झेवियर मस्कने अशी औषधे वापरून नंतर लिंगबदल करून विव्हियन जेना विल्सन अशी मुलीची ओळख निर्माण केली. इलाॅन मस्कच्या मते अशी औषधे देणे हे गुन्हेगारी कृत्य आहे! अर्थातच या विषयावर जगभर उलटीसुलटी मते मांडली जात आहेत.

आपल्या भारतासाठी कदाचित हा विषय थोडा नवीन वाटत असेल; परंतु ‘प्युबर्टी ब्लाॅकर्स’ आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांना नवीन नाहीत. ‘गोनॅडोट्राॅपीन रिलिझिंग हार्मोन’ ‘ॲनालाॅग्झ’ जातीतील ही औषधे ज्या मुलांमध्ये पौगंडावस्थेची सुरुवात अपेक्षेपेक्षा खूप लवकर (मुलींमध्ये आठव्या वर्षाच्या आधी आणि मुलांमध्ये नवव्या वर्षाच्या आधी) झाली असेल तर खूप साऱ्या तपासण्या करून पालकांचे समुपदेशन करून मगच दिली जातात. ही पौगंडावस्थेची लवकर सुरुवात ‘प्रिकाॅशियस प्युबर्टी’ म्हणून ओळखली जाते. ही औषधे बराचकाळ द्यावी लागतात. ती देताना वरचेवर तपासण्याही करत राहाव्या लागतात आणि औषधे महागही असतात. औषधे बंद केली तर पुनश्च पौगंडावस्थेची सुरुवात होते.

पौगंडावस्था लवकर येण्याने मुलांच्या उंचीवर परिणाम होतो, त्यांच्यातले शारीरिक बदल समजण्याएवढी त्यांची वैचारिक कुवत नसते आणि बरोबरीच्या मुलांकडून अवहेलनाही होते. म्हणूनच लहान मुलांचे हार्मोन तज्ज्ञ ही औषधे देऊन या मुलांना इतर मुलांच्या बरोबरीने वाढायला मदत करतात. विशेषत: मुलींमध्ये याचा चांगला उपयोग जाणवतो. मोठ्या वयस्क व्यक्तींमध्ये काही विशिष्ट आजारांमध्येही (पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग, स्त्रियांमध्ये एन्डोमेट्रीओसिस) या औषधांचा काळजीपूर्वक वापर केला जातो. वयात येणाऱ्या मुलांमध्ये क्वचित प्रसंगी ज्या मुलांची मानसिक, सामाजिक वाढ त्यांच्या वयानुरूप नसते व त्यातून त्यांना शाळेत, समाजात वावरायला खूपच समस्या येत असतील तर थोड्या कालावधीकरिता ही औषधे वापरता येतात. विशेषत: पौगंडावस्थेतील गंभीर स्वरूपाच्या स्वमग्नतेमध्ये या औषधांचा क्वचित प्रसंगी उपयोग होऊ शकतो. सध्याचा वाद हा वरील कुठल्याच कारणामुळे नसून ‘जेंडर डिस्फोरिया’ची समस्या असलेल्या मुलांमध्ये या औषधांचा अनिर्बंधित, सर्रास वापर होण्यावर आहे. ‘जेंडर डिस्फोरिया’ ही एक गुंतागुंतीची समस्या आहे. यात मुलांना आपल्या शारीरिक लिंगापेक्षा वेगळी/विरुद्ध, मानसिक लैंगिक ओळख वाटत असते. उदा. मुलाला आपण ‘मुलगी’ असल्यासारखे वाटत असते. मुलींसारखे वागावे, कपडे घालावेत, असे वाटत असते. मुलीला आपण मुलगा आहोत / असावेसे वाटते. त्यामुळे त्यांच्यात खूप अस्वस्थता असते. स्वत:च्या शरीरातील बदलांबद्दल त्रास होत असतो. अशावेळेस त्यांना स्वत:च्या लैंगिक ओळखीबद्दल समज यायला वेळ मिळावा म्हणून ही ‘प्युबर्टी ब्लाॅकर्स’ दिली जात होती. पण, मग बरोबरीने समुपदेशन करून आणि वैद्यकीय उपचारांच्या मदतीने त्यांना दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो.

पण, ही प्रकिया वाटते तेवढी सोपी नाही. त्याचे अनेक दुष्परिणामही आहेत. सर्वप्रथम ‘जेंडर डिस्फोरिया’ या कारणासाठी या औषधांचा वापर खरोखरच सुरक्षित आहे का? याबद्दल पुरेसे संशोधन झालेले नाही. बरोबरीने या औषधांच्या चुकीच्या डोसमध्ये, चुकीच्या कालावधीसाठी वापराने गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात, याची कल्पना नसते. जास्त काळ ही औषधे वापरण्याने हाडे ठिसूळ होऊन फ्रॅक्चर होऊ शकते, पुढे जाऊन वंध्यत्व होऊ शकते, मानसिक समस्याही उद्भवू शकतात. ही औषधे वापरण्यासाठीच्या संमतीवर पालक आणि मुलांमध्ये वाद होऊ शकतात. या व अशा अनेक कारणांसाठी इंग्लंडमध्ये या ‘प्युबर्टी ब्लाॅकर्स’चा ‘जेंडर डिस्फोरिया’ असलेल्या मुलांसाठीचा वापर प्रतिबंधित केला आहे. पण, लवकर येऊ घातलेल्या पौगंडावस्थेसाठीचा वैद्यकीय देखरेखीखालील उपचार मान्यताप्राप्त आणि योग्यच आहे.

(Image : google)

या विचित्र घटनेतून आपण समाज म्हणून काय शिकू शकू?

१. प्रसिद्ध होणाऱ्या / व्हायरल होणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राच्या संबंधित बातम्या जशाच्या तशा न स्वीकारता योग्य तज्ज्ञांशी बोलून, समजून मगच त्यांचा अर्थ लावावा. २. मुलांच्या लैंगिक जडणघडणीबाबत लहान वयापासूनच जागरूक असावे. सहज, वयानुरूप उदाहरणांमधून त्यांना याबद्दल माहिती देत राहावी. ३. मुलांची स्वत:बद्दलची लैंगिक समज ‘वेगळी’ वाटली तर झिडकारून न टाकता मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ४. कुठल्याही औषधाचा स्वत:च्या डोक्याने स्वत:वर किंवा आपल्या मुलांवर प्रयोग करू नये.

टॅग्स : आरोग्यलहान मुलंहेल्थ टिप्सपालकत्व