Ginger And Honey Benefits : मध आणि आल्याचा वापर भारतीय घरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. मध एक नॅचरल स्वीटनर आहे तर आलं एक नॅचरल मसाला आहे. चहा करणं असो, भाजीचा मसाला असो वा अजूनही काही असो त्यात आल्याचा वापर केला जातो. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, आलं आणि मध एकत्र खाल्ल्यानं आरोग्याला किती आणि कसे फायदे मिळतात.
मध आणि आल्यामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात. या दोन्ही गोष्टींचा वापर सर्दी, खोकला आणि श्वसनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी फार पूर्वीपासून केला जातो. मात्र, यांचे इतरही अनेक फायदे मिळतात. जे लोकांना माहीत नसतात. अशात या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्यावर आरोग्याला काय काय फायदे मिळतात हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मध आणि आलं एकत्र खाण्याचे फायदे
पचन तंत्र सुधारतं
आल्यामधील एंझाइम्स पचनक्रिया मजबूत करण्यास मदत करतात. तर मधातील अॅंटी-बॅक्टेरिअल गुण शरीरासाठी नुकसानकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात.
सर्दी-खोकला, घशातील खवखव होईल दूर
आलं आणि मधाचं कॉम्बिनेशन सर्दी-खोकला दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. तसेच यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात जे घशात होणारी खवखव दूर करण्यास मदत करतात. मधानं घशाला आराम मिळतो आणि खोकला दूर होतो.
इम्यूनिटी मजबूत होते
मध आणि आलं दोन्हींमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. ज्यामुळे वेगवेगळे आजार आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो. मध आणि आल्याच्या कॉम्बिनेशनं उलटी, मळमळ, अॅलर्जी आणि तणावापासून सुटका मिळू शकते.
हृदयासाठी फायदेशीर
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, आलं आणि मध हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आल्यात रक्ताच्या गाठी मोकळ्या करण्याचे आणि कोलेस्टेरॉल कमी करण्याचे गुण आहेत. ज्यामुळे तुम्हाला हृदय निरोगी ठेवण्यास मदत मिळू शकते.
कसं खावं?
मध आणि आलं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं खाऊ शकता. आलं बारीक करून त्यात मध टाकून तुम्ही खाऊ शकता किंवा आल्याचं पाणी करून त्यात थोडं मध टाकून पिऊ शकता. त्याशिवाय आलं आणि मधाचा चहा सुद्धा पिऊ शकता.