विदर्भातील पारंपरिक पदार्थांपैकी एक म्हणजे सांबार वडी. ज्याला पुडाची वडी असेही म्हटले जाते. सांबार म्हणजे कोथिंबीर. भरपूर कोथिंबीर घालून केली जाणारी ही वडी चवीला छान तर असतेच पण जरा वेगळा असा पदार्थ आहे. (Vidarbha special recipe: Easy way to make spicy sambar vadi, a dish you've never tried before)एकदा नक्की करुन पाहा. कोथिंबीर वडी आपण नेहमी खातोच. मात्र हा पदार्थ अगदी वेगळा आहे. सामग्री आणि कृतीही वेगळीच आहे. पाहा कशी करायची ही पुडाची वडी.
साहित्य
सुकं खोबरं, कोथिंबीर, खसखस, तीळ, जिरे पूड, ओवा, आमचूर पावडर, चाट मसाला, लाल तिखट, हळद , तेल, चारोळी, साखर, बेसन, मैदा, हिंग, मीठ
कृती
१. एका परातीत मैद्याचे पीठ आणि बेसनाचे पीठ एकत्र करा. मैदा जर दोन वाटी असेल तर अर्धी वाटी बेसन घ्यायचे. त्यात कडक गरमागरम तेल ओता. दोन चमचे तेल घाला आणि पीठ मिक्स करा. त्यात हातावर मळून ओवा घाला तसेच चमचाभर हळद घाला. चवी पुरते मीठ घाला आणि घट्ट पीठ भिजवून घ्या. भिजवलेले पीठ १५ मिनिटे झाकून ठेवा.
२. कढईत तीळ भाजायचे. भाजून झाल्यावर गार करायचे आणि जाडसर वाटायचे. कोथिंबीर एकदम बारीक चिरायची. त्या नंतर कढई गरम करत ठेवायची आणि त्यात किसलेलं सुकं खोबरं घालून परतायचं. खोबरं जरा खमंग झाल्यावर त्यात कोथिंबीर घालायची. कोथिंबीरही छान परतायची. मग त्यात तीळ घालायचे. तसेच चारोळी घालायची आणि मग लाल तिखट, हळद, चाट मसाला, हिंग, आमचूर पूड, साखर आणि चवी पुरते मीठ घालून परतायचे. मिश्रण छान खमंग परता.
३. पीठाचे लहान गोळे करुन घ्या. त्याची पातळ पुरी लाटा आणि त्यात तयार केलेले सारण भरा. दोन्ही बाजूंनी दुमडा आणि पाण्याने टोकं चिकटवून घ्या. त्याची पुडी तयार करायची. सगळ्याच पुड्या तयार करुन घ्या आणि गॅसवर तेल तापत ठेवा. तेल छान गरम झाल्यावर मध्यम आचेवर खमंग पुडी तळून घ्यायची. छान सोनेरी तळायचे. बाहेरुन कुरुकरीत आणि आतून मऊ अशीही सांबार वडी एकदम चविष्ट असते.