आपल्या खास महाराष्ट्रीय रेसिपी कायमच पौष्टिक आणि करायला सोप्या असतात. अगदी पाच मिनिटांत होणाऱ्या अनेक पौष्टिक रेसिपी आहेत, ज्या ठराविक ऋतूमध्ये खायलाच हव्यात. शरीरासाठी त्याचा फायदा असतो. जसे की ही बाजरीची हाव. महाराष्ट्रात फार आवडीने केली जाते आणि खाल्लीही जाते. (Traditional recipe for making millet recipes, a nutritious dish of raagi , authentic food)लहान मुलांसाठी हा पदार्थ खास आहे. सर्दी खोकला तसेच ताप असेल तर मुलांना हा पदार्थ प्यायला द्यावा. पाच मिनिटांत होतो आणि वाटीभर सुद्धा फायद्याचा ठरतो. काही ठिकाणी याला पिठवणी असेही म्हटले जाते. तर काही ठिकाणी बाजरीचा घाटा म्हणतात. काही बाजरीची पेज म्हणतात तर काही ठिकाणी बुळग असे ही म्हटले जाते. विविध जिल्ह्यात वेगळ्या नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ लोकप्रिय आणि सातत्याने केला जाणारा आहे.
बाळंतिणीलाही ही पेज दिली जाते. तसेच पाळीच्या दिवसांत हा पदार्थ पोटाला आराम देणारा ठरतो. बाजरीची फक्त भाकरीच खात असाल तर बाजरीचे असे पदार्थही करता येतात. नक्की करुन पाहा. लहान मुलांना हिवाळ्यात रोज प्यायला द्या. अजिबात आजारी पडणार नाहीत.
साहित्य
बाजरीचे पीठ, तूप, पाणी, मीठ, जिरे पूड, गूळ पूड
कृती
१. एका कढईत चमचाभर तूप घ्यायचे. त्यात थोडे बाजरीचे पीठ घालायचे आणि परतून घ्यायचे. अगदी चार चमचे बाजरीचे पीठही पुरेसे असते. प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या. बाजरीचे पीठ तुपावर एकदम मस्त परतून घ्यायचे. छान परतून झाल्यावर त्यात पाणी घालायचे.
२. पाणी घातल्यावर त्यात चमचाबर जिरे पूड घालायची. त्यात चमचाभर गूळ पूड घालायची. ढवळायचे आणि एकजीव करुन घ्यायचे. तसेच थोडे मीठही घालायचे. उकळी येऊ द्यायची. छान उकळून घ्यायचे. गरमागरम प्यायचे.
