नाचणीची खिचडी ही पारंपरिक, साधी पण अत्यंत पौष्टिक अशी भारतीय रेसिपी आहे. विशेषतः आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत शरीराला आवश्यक असलेले पोषण देणारा, सहज पचणारा आणि सर्व वयोगटांसाठी उपयुक्त असा हा आहार आहे. (Traditional and delicious recipe for making ragi khichdi, tasty and healthy , must try this recipe )नाचणी (रागी) आरोग्याच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असल्यामुळे नाचणीची खिचडी ही संपूर्ण पोषण देणारी मानली जाते.
नाचणीत अनेक महत्त्वाची पोषणतत्त्वे आढळतात. त्यात कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते, जे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. याशिवाय नाचणीत लोह (आयर्न), मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम यांसारखी खनिजे असतात. नाचणी ही आहारातील तंतूंनी (फायबर) समृद्ध असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्यात चांगल्या प्रतीचे कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला ऊर्जा देतात, तसेच काही प्रमाणात प्रोटीन ही मिळते. नाचणीत नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट्सही असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयोगी ठरतात. लहान मुलांसाठी हा पदार्थ अगदी मस्त आहे. करायलाही सोपाच.
साहित्य
नाचणीचे पीठ, मूगडाळ, तांदूळ, तूप, जिरे, हिंग, टोमॅटो, गाजर, मटार, पाणी, हळद, मीठ
कृती
१. चमचाभर तांदूळ आणि चमचाभर मूगडाळ एका वाटीत भिजवायची. पाच मिनिटे भिजवायचे, स्वच्छ धुवायचे.टोमॅटो चिरुन घ्यायचे. तसेच गाजर सोलायचे आणि चिरुन घ्यायचे. मटार निवडायचे. नाचणीचे पीठ एका वाटीत थोड्या कोमट पाण्यात भिजवायचे. त्यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची. दोन चमचे पीठ भरपूर झाले.
२. एका कुकरमध्ये चमचाभर तूप घ्यायचे. त्यात चमचाभर जिरे घालायचे. नंतर चमचाभर हिंग घालायचे. नंतर त्यात मटार घालायचे. गाजराचे तुकडेही घालायचे. टोमॅटो घालायचा आणि ढवळायचे. चमचाभर हळद घालायची. तसेच थोडे मीठ घालायचे आणि मिक्स करायचे. भिजवलेली मूगडाळ आणि तांदूळ घालून मिश्रण एकजीव करायचे. त्यात थोडे पाणी घालायचे आणि ढवळायचे.
३. नंतर त्यात तयार केलेले नाचणी सत्व घालायचे. ढवळायचे आणि गरजेनुसार पाणी घाला. कुकर लावा आणि मस्त शिट्या काढून घ्या. गरमागरम खा. खाताना त्यात तूप घाला. चवीला मस्त लागते. तसेच लहान मुलांसाठी अगदी मस्त रेसिपी आहे. नक्की करुन पाहा.
