कोशिंबीर हा पदार्थ करायला अगदी सोपा असतो. तसेच लोकं आवडीने खातात. करायला फार वेळ लागत नाही आणि हा पदार्थ पौष्टिक असतो. तसेच कधी भाजी नाही केली आणि भातासोबतही काही वेगळे खायची इच्छा असेल तर कोशिंबीर हा पदार्थ अगदी मस्त पर्याय आहे. (Tired of making same recipes? Then make a delicious onion salad in 5 minutes - even without cucumber or tomato, it is still delicious.)विविध प्रकारच्या कोशिंबीर केल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे कांद्याची कोशिंबीर. करायला अगदीच सोपी असते आणि चवीला तेवढीच मस्त. त्यामुळे हा पदार्थ नक्की करुन पाहा. सगळ्यांनाच आवडेल आणि करायला जास्त वेळही लागणार नाही. टोमॅटो, काकडी असे पदार्थ घरात नसतील आणि कांदाच असेल घरी तर ही कोशिंबीर करायला काहीच हरकत नाही. पाहा कशी करायची.
साहित्य
कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, मीठ, चाट मसाला, लाल तिखट, तेल, मोहरी, जिरे, कडीपत्ता, हिंग, शेंगदाणे
कृती
१. कांदा सोलून घ्यायचा नंतर छान बारीक चिरायचा. कोथिंबीर निवडायची. स्वच्छ धुवायची आणि मग बारी चिरायची. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. त्यावर शेंगदाणे परतून घ्यायचे. छान खमंग परतायचे.
२. एका खोलगट भांड्यात दही घ्यायचे. दही मस्त फेटायचे. त्यात थोडे मीठ घालायचे आणि नंतर चाट मसाला घालायचा. थोडे लाल तिखट घालायचे. ढवळायचे आणि मिश्रण एकजीव करायचे. त्यात छान बारीक चिरलेला कांदा घालायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. परतलेले शेंगदाणे घालायचे. दह्यात सारे मिक्स करायचे.
३. एका फोडणी पात्रात थोडे तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यावर त्यात चमचाभर मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे घालायचे आणि जिरेही फुलू द्यायचे. नंतर त्यात कडीपत्याची पाने घालायची. कडीपत्ता छान तडतडू द्यायचा. मग फोडणी कोशिंबीरीवर ओतायची. मस्त ढवळायचे आणि मग पाच मिनिटे कोशिंबीर मुरु द्यायची. मग भात, पोळी, खिचडी कशासोबतही खाऊ शकता.
