मूगडाळ ही भारतीय स्वयंपाकघरातील एक हलकी, पचायला सोपी आणि पौष्टिक डाळ मानली जाते. पण अनेकदा प्रश्न पडतो की सालासकट मूगडाळ चांगली की सालं काढलेली. तसेच पिवळी मूगडाळ घ्यावी की हिरवी मूगडाळ अधिक आरोग्यदायी असते? याचे उत्तर एकाच शब्दात देता येत नाही, कारण दोन्ही प्रकारांची पोषणमूल्ये आणि उपयोग वेगवेगळे आहेत.
हिरवी मूगडाळ म्हणजे संपूर्ण मूग. यावर हिरवी साल असते आणि तीच साल फायबरचा मुख्य स्रोत असते. त्यामुळे सालासकट हिरवी मूगडाळ पचनासाठी उपयुक्त ठरते, बद्धकोष्ठता कमी करते आणि पोट जास्त वेळ भरलेले ठेवते. (This lentil is a must-have in your diet - yellow or green? Which is more nutritious?)वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ही डाळ चांगली मानली जाते. हिरव्या मूगडाळीत प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटी ऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात. मात्र काही लोकांना सालामुळे ही डाळ पचायला थोडी जड जाऊ शकते, विशेषतः ज्यांचे पचन कमकुवत आहे त्यांना जरा त्रास होऊ शकतो.
बाजारात सहन मिळणारी पिवळी मूगडाळ आजारपणात, तापानंतर किंवा लहान मुलांसाठी खिचडी करण्यासाठी उत्तम मानली जाते. यातही प्रथिने भरपूर असतात, पण फायबरचे प्रमाण हिरव्या मूगडाळीपेक्षा कमी असते. त्यामुळे ही डाळ पोटावर ताण न देता ऊर्जा देते. तसेच पटकन शिजते.
पोषणाच्या दृष्टीने पाहिले तर हिरवी मूगडाळ फायबर आणि सूक्ष्म पोषकतत्त्वांमध्ये पुढे आहे, तर पिवळी मूगडाळ पचनसुलभतेमध्ये पुढे आहे. हिरव्या मूगडाळीत बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, अँटी ऑक्सिडंट्स आणि खनिजे जास्त प्रमाणात मिळतात. पिवळ्या मूगडाळीत ही पोषकतत्त्वे थोडी कमी असली तरी शरीराला आवश्यक प्रथिने आणि ऊर्जा सहज मिळते.
सालासकट मूगडाळ रक्तातील साखर हळू वाढवते, त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी ती फायदेशीर ठरु शकते. तर साल नसलेली मूगडाळ आजारी व्यक्ती, वृद्ध आणि पचनाच्या तक्रारी असणाऱ्यांसाठी योग्य ठरते. त्यामुळे ती आहारात असावीच.
म्हणूनच कोणती मूगडाळ चांगली यापेक्षा कोणत्या परिस्थितीत कोणती मूगडाळ उपयुक्त आहे, हे महत्त्वाचे आहे. रोजच्या आहारात बदल ठेवण्यासाठी आणि सर्व प्रकारचे पोषण मिळवण्यासाठी सालासकट हिरवी मूगडाळ आणि साल नसलेली पिवळी मूगडाळ दोन्हीचा समतोल वापर करणे हेच आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.
