नाश्त्यासाठी खास करा हे साबुदाण्याचे अप्पे. उपासाच्या दिवसांत चविष्ट आणि पोटभरीचं काहीतरी खायचं असेल तर साबुदाण्याचे अप्पे हा एक उत्तम पर्याय आहे. उपासाला चालणाऱ्या पदार्थांपासून तयार होणारे हे अप्पे हलके, तरीही ऊर्जादायी असतात. (The taste of sabudana vada but use only 1 teaspoon of oil, see the easy and tasty recipe for making sabudana appe)साबुदाण्यामुळे लगेच ऊर्जा मिळते आणि थकवा किंवा अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.
साबुदाण्याचे अप्पे मऊ, खुसखुशीत असतात. फार तिखट नसल्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच ते आवडतात. दाण्यांची चव, जिरे किंवा हिरव्या मिरचीचा स्वाद यामुळे अप्प्यांची चव खुलते. ते तेलकट किंवा पचायला जास्त जड नसतात, त्यामुळे पोटभर खाल्यावरही पोटावर ताण येत नाही. हलका नाश्ता आणि मध्यल्या सुट्टीतला डबा म्हणून हा पदार्थ मस्त आहे.
साहित्य
साबुदाणा, बटाटा, शेंगदाण्याचे कुट, हिरवी मिरची, मीठ, तेल, पाणी
कृती
१. रात्रभर साबुदाणा भिजत ठेवायचा. सकाळी फुगलेला साबुदाणा हाताने जरा कुस्करायचा. बटाटे उकडायचे. उकडलेले बटाटे गार करायचे आणि मग सोलून घ्यायचे. सोलल्यावर व्यवस्थित कुस्करायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे आणि ते मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. मिक्सरमधून वाटून किंवा ठेचून त्याची पेस्ट तयार करायची.
२. एका खोलगट पातेल्यात किंवा परातीत साबुदाणा घ्यायचा. त्यात कुस्करलेला बटाटा घालायचा. हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची. तसेच चवीनुसार मीठ घालायचे. त्यात शेंगदाण्याचे कुट घालायचे. चमचाभर तेल घालायचे. सगळे छान मिक्स करायचे, एकजीव करायचे.
३. अप्पे पात्र गरम करत ठेवायचे. ते छान तापल्यावर त्याला तेल लावायचे. तयार केलेल्या साबुदाण्याच्या मिश्रणाचे गोल तयार करायचे. ते अप्पेपात्रात ठेवायचे आणि छान शिजू द्यायचे. दोन्ही बाजूनी खमंग कुरकुरीत होऊ द्यायचे. एका बाजूने पूर्ण शिजले की ते आरामात उलथता येतील. मग दोन्ही बाजू सोनेरी होईपर्यंत परतायचे.
