कोहळा म्हणजेच एक अत्यंत पौष्टिक असा पदार्थ आहे. तो पचायला हलका असतो. करायला एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे. आरोग्य चांगले राहावे यासाठी फार फायद्याचा ठरतो. (Super food for women: Drink ash gourd soup every day! healthy and tasty recipe )कोहळ्याचं सुप चवीला फार छान असते. पौष्टिक, उष्णतेचा त्रास कमी करुन आराम देणारं आणि पचनासाठी अगदीच चांगलं असं हे सूप महिलांसाठी जास्त फायद्याचं आहे. काहीजण कोहळा खायला नको म्हणतात, त्याची चव अनेकांना आवड नाही. मात्र एकदा हे सूप प्यायलं तर कोहळा नक्की आवडायला लागेल. अगदी गरमागरम प्यायचं. संध्याकाळच्या वेळेला खायचं त्यामुळे छान शांत झोप लागते. मुलांनाही आवडतं.
साहित्य
कोहळा, आलं, मिरी पूड, हळद, मीठ, तूप, जिरं, हिंग, पाणी, कोथिंबीर
कृती
१. एक मध्यम आकाराचा कोहळा घ्यायचा. त्याची साल काढायची आणि बिया बाजूला काढून टाकायच्या. मग कोहळ्याचे लहान लहान तुकडे करायचे. स्वच्छ धुवून घ्यायचे.
२. एक पातेलं घ्यायचं. त्यात थोडं तूप गरम करायचं.त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं.जिरं छान फुललं की हिंग घाला. मग त्यात एक छोटा आल्याचा तुकडा किसून घालायचा. फोडणी छान खमंग करायची. फोडणीचा सुगंध आला की त्यात कोहळ्याचे तुकडे घालायचे. थोडा वेळ परतून घ्यायचे. मग त्यात अर्धा चमचा हळद, थोडंसं मीठ आणि एक वाटीभर पाणी घालायचे. झाकण ठेवून शिजू द्यायचे. मस्त मऊ होईपर्यंत शिजवायचे.
३. कोहळा शिजला की गॅस बंद करायचा. कोहळा गार करुन घ्यायचा. गार झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा. मग मिक्सरमधून वाटून घ्यायचे. पातळ अशी पेस्ट तयार करायची. गरजे पुरते पाणी घालून कोहळा वाटून घ्यायचा.
४. गॅसवर कढई तापवायची. त्यात थोडे तूप घाला आणि मग तयार केलेले मिश्रण घालून मस्त परतून घ्या. नंतर थोडं पाणी घालायचं. एक उकळी काढायची. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तसेच थोडी मिरी पूड त्यात घालायची. थोडी हळद घालायची.
गरमागरम आणि पौष्टिक असे हे सूप नक्की प्या. महिलांसाठी कोहळा फार पौष्टिक असतो. त्यामुळे आहारात हे सूप असणं फार फायद्याचं ठरेल.