शिमगा झाला आणि उन्हाळ्याची चाहुल लागली. वातावरण उष्ण व्हायला सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी तर ऊन चांगलंच कडाडलेलं असतं. अशावेळी उन्हाळा स्पेशल पदार्थांचीही आठवण येतेच. त्यात सगळ्यात आधी नंबर लागतो तो कैरीचा. सध्या बाजारात कैऱ्या विकत मिळायला सुरुवात झाली आहे. आता कैरीचे भाव थोडे जास्त असले तरी खवय्यांना ती खाण्याचा मोह होतोच. तुम्हालाही कैरी मनापासून आवडत असेल तर ही कैरी आणि कच्च्या कांद्याची इंस्टंट चटणी करून पाहाच. ही चटणी चवीला अतिशय मस्त लागते (Summer Special Kairi Chutney Recipe). पोळी, भाकरी, भात, खिचडी अशा कशासोबतही तोंडी लावायला ती अगदी उत्तम आहे.(raw mango onion chutney recipe)
कैरी आणि कांद्याची इंस्टंट चटणी रेसिपी
साहित्य
१ मध्यम आकाराची कैरी आणि मध्यम आकाराचा कांदा
१ टीस्पून हळद आणि चवीनुसार तिखट- मीठ
५ ते ६ लसूण पाकळ्या आणि १ टेबलस्पून डाळवं
फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे हिंग
बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे
कृती
कैरी आणि कच्च्या कांद्याची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी कैरी धुवून घ्या आणि तिचे सालं काढून घ्या. यानंतर ती थोडी ओबडधोबड चिरून घ्या. यानंतर कांदा अगदी बारीक चिरून घ्या.
चिरलेली कैरी खलबत्त्यामध्ये घाला. तिच्यामध्ये तिखट, मीठ आणि हळद घालून ती बारीक कुटून घ्या. यानंतर तिच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घाला आणि सगळं एकत्रितपणे एकजीव होईपर्यंत बारीक कुटून घ्या.
सगळ्यात शेवटी तेल, मोहरी, हिंगाची कडकडीत फोडणी घालून थोडीशी साखर घाला. सगळं एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की कैरीची इंस्टंट चटणी तयार..
