इडली (Idli) म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पण इडली करायची म्हणजे तांदूळ, डाळ भिजवून ठेवा ते दळा बरीच झंझट असते. लगेचच्या लगेच केली आणि खाल्ली असं इडलीच्या बाबतीत होत नाही. पण इंस्टंट इडली करणं एकदम सोपं आहे. (How To Make Instant Rawa Idli)
फक्त इडलीत डाळ, तांदळाऐवजी रव्याचा वापर करायचा. व्यवस्थित, पद्धतशीर रेसिपी फॉलो करून इडली बनवली तर रवा इडली ही मऊ फुलते आणि डाळ, तांदळाच्या इडलीसारखीच रूचकर, मऊ लागते. रवा इडलीची सोपी रेसिपी पाहूया. (How To Make Soft Perfect Rawa Idli)
रव्याची इडली कशी करायची?
एका मोठ्या भांड्यात रवा आणि दही घ्या. त्यात मीठ आणि साधारण १ वाटी पाणी घालून चांगले मिक्स करा. गुठळ्या होऊ देऊ नका. मिश्रण जास्त घट्ट किंवा खूप पातळ नसावे. इडलीच्या पीठासारखं सरसरीत ठेवा. हे मिश्रण १० ते १५ मिनिटे झाकून बाजूला ठेवा, म्हणजे रवा फुगून येईल.
एका छोट्या कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला, ती तडतडल्यावर उडीद डाळ घाला आणि ती सोनेरी झाल्यावर कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून लगेच गॅस बंद करा.ही फोडणी रव्याच्या मिश्रणात एकत्र करा. फोडणी घातल्याने इडलीला छान चव येते.
इडली कुकरमध्ये किंवा मोठे भांडे पाणी गरम करायला ठेवा, वाफ येईपर्यंत थांबा. इडलीच्या साच्याला तेव्हाच तेल लावून घ्या. जेव्हा पाणी गरम होऊन वाफ तयार होईल आणि साच्याला तेल लावून होईल, तेव्हाच मिश्रणात इनो फ्रुट सॉल्ट घाला. त्यावर १-२ चमचे पाणी टाकून इनो सक्रिय करा आणि मिश्रण हलक्या हाताने लगेच एकजीव करा. इनो घातल्यावर मिश्रण लगेच फुलते.
हे फुललेले मिश्रण लगेच तेल लावलेल्या इडलीच्या साच्यांमध्ये ओता. साचे जास्त भरू नका, कारण इडली फुगते. इडलीचे साचे कुकरमध्ये ठेवा आणि झाकण लावून मध्यम आचेवर १० ते १२ मिनिटे वाफवून घ्या. १० मिनिटांनंतर, इडली शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यात चाकू किंवा टूथपिक घालून बघा. जर ते स्वच्छ बाहेर आले, तर इडली तयार आहे. गॅस बंद करून १ मिनिट थांबा. चमच्याच्या मदतीने इडल्या साच्यातून काढून घ्या.गरमागरम इंस्टंट रवा इडली सांबार आणि चटणीसोबत सर्व्ह करा.
