मुगाची भाजी किंवा मुगाची उसळ तर आपण नेहमीच खातो. मात्र मोड आलेल्या मुगाची आमटी कधी खाल्ली का? करायला अगदीच सोपी आहे आणि चव जाम भारी. (Sprouted Moong Curry – A nutritious, traditional Protein-Rich Delight, tasty homemade recipe)एकदा केली तर पुन्हा नक्कीच कराल. पौष्टिक तर आहेत शिवाय लहान मुलांनाही आवडेल अशी रेसिपी आहे. मसाले आवडीनुसार घाला. पाहा सोपी रेसिपी.
साहित्य
मूग, आलं, लसूण, हिरवी मिरची, पांढरे तीळ, पाणी, टोमॅटो, ओलं खोबरं, मीठ, लाल तिखट, कडीपत्ता, मोहरी, जिरे, हळद, कोथिंबीर, कांदा
कृती
१. मूगडाळ रात्रभर भिजवायची. त्याला मोड आले की चव आणि पोषण दोन्ही वाढतं. कांदा लांब लांब चिरुन घ्यायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. तसेच ताजा नारळ खवायचा. ओलं खोबरं मस्त लागतं. घट्टपणाही छान येतो.
२. एका कढईत थोडं तेल घ्यायचं. तेल गरम झालं की त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि मस्त परतून घ्यायचे. कांदा घालायचा आणि गुलाबी परतायचा. त्यात ओलं खोबरं घालायचं. तसंच टोमॅटो आणि पांढरे तीळ घालायचे आणि मस्त परतायचे.
३. परतून झाल्यावर मिश्रण जरा गार करायचे. मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि त्याचे वाटण तयार करायचे. छान एकजीव वाटायचे. पेस्ट तयार करायची. गरज असेल तर वाटण्यासाठी पाणी वापरा. जास्त नको थोडेच घ्यायचे. एका कढईत थोडं तेल घ्या त्यात मोहरी घाला. मस्त तडतडली की जिरे आणि कडीपत्ता घाला, परतून घ्यायचे. त्यात तयार केलेले वाटण घालायचे. थोडे पाणी घालायचे आणि वाटण घट्ट होईपर्यंत परतायचे.
४. त्यात मूग घालायचे आणि थोडे परतल्यावर त्यात हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला. परतून घ्या मग पाणी ओता आणि झाकण ठेवा. मूग शिजू द्या. आमटी आटायला लागते आणि मसाल्यात मूग मुरतात. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. थोड्या वेळ झाकण काढून उकळून घ्या. गरमागरम भात आमटी आणि वरती तूप असेल तर जेवणाची रंगत वाढेल.
