पालक आणि मूगडाळीचे बॉल्स हे चवीला मस्त असतात तसेच ते आरोग्यदायी स्नॅक आहेत. हिरव्या पालकात लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असतात. तर मूगडाळ प्रथिनांनी समृद्ध असते. हे दोन्ही घटक एकत्र करुन तयार केलेले पदार्थ शरीराला ऊर्जा, ताकद आणि रोगप्रतिकारशक्ती देतात. (Spinach - Moongdal Balls - Nutritious for evening snack - Delicious recipe, absolutely tasty dish)हे बॉल्स तळलेले नसून वाफवून किंवा हलक्या तेलात परतून केले जातात, अप्पेपात्रातही करता येतात. त्यामुळे ते पौष्टिक असतात आणि पचायला हलके असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा एक उत्कृष्ट नाश्ता आहे. चव आणि पौष्टिकता दोन्ही म्हणजे पालक-मूगडाळीचे बॉल्स.
साहित्य
पालक, मूगडाळ, हिरवी मिरची, आलं, बेसन, मीठ, पनीर, जिरे पूड, तेल, लाल तिखट, कोथिंबीर
कृती
१. मूगडाळ भिजत ठेवायची. पनीर किसून घ्यायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. आल्याचा तुकडा घ्यायचा. कोथिंबीर निवडून घ्यायची. एका पातेल्यात पाणी घ्यायचे. त्यात पालक उकळायचा.
२. एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मूगडाळ घ्यायची. तसेच पालक घ्यायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. कोथिंबीर घ्यायची. आल्याचा तुकडा घ्यायचा. वाटून घ्यायचे. पाणी घालू नका. वाटून झाल्यावर एका खोलगट भांड्यात किसलेले पनीर घ्यायचे. त्यात पालकाची पेस्ट घालायची. थोडे बेसन घालायचे. जिरे पूड घालायची. लाल तिखट घालायचे. चवी पुरते मीठ घालायचे. मिक्स करायचे. पातळ करायचे नाही.
३. अप्पेपात्र गरम करायचे. त्याला तेल लावायचे. तसेच तयार पिठाचे गोळे तयार करायचे. अप्पेपात्रात लावायचे आणि दोन्ही बाजूनी परतून घ्यायचे. छान खमंग आणि कुरकुरीत होतात.
