सॅण्डविच हा पदार्थ तसा पौष्टिक मानला जातो. लहान मुलांना द्यायला हा पदार्थ छान पर्याय आहे. तसेच वृद्ध व्यक्तींसाठीही मस्त असा पदार्थ आहे. मात्र सॅण्डविच खाताना आतील भाज्या पडतात आणि नीट चावता येत नाहीत. ( Special recipe for kids and elders, unique way to make a delicious sandwich, must try )असे होत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. या पद्धतीने केलेले सॅण्डविच खायला अगदी सोपे जाते. तसेच तयारही झटपट होते. पाहा कसे करायचे खास सॅण्डविच.
साहित्य
बटाटा, बीट, काकडी, कोबी, सिमला मिरची, टोमॅटो, गाजर, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू, चाट मसाला, बटर, ब्रेड, लसूण, टोमॅटो सॉस, चीज, मीठ, दही
कृती
१. बटाटे उकडून घ्यायचे. गार करायचे आणि त्याची सालं काढून घ्यायची. मग तो किसायचा आणि बाजूला ठेवायचा. तसेच काकडी सोलायची आणि किसून घ्यायची. बीटही बटाट्यासोबतच उकडून घ्या आणि बीट सोलून बीटही छान किसुन घ्यायचे. सिमला मिरची अगदी बारीक चिरायची. तसेच कोबी किसून घ्यायचा. गाजर सोलायचे आणि गाजरही किसायचे. टोमॅटो अगदी बारीक चिरायचा.
२. एका मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या काही पाकळ्या घ्यायच्या. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. तसेच थोडी कोथिंबीर घालायची अगदी थोडे पाणी घालायचे आणि वाटायचे. घट्ट अशी चटणी तयार करायची.चटणीत थोडे दही घालायचे आणि चटणी कालवून घ्यायची. त्यात गरजे नुसार मीठ घालायचे.
३. किसून घेतलेल्या सगळ्या भाज्या एका खोलगट पातेल्यात मिक्स करायच्या. त्यात चाट मसाला घालायचा आणि लिंबाचा रसही घालायचा. तसेच तयार केलेली चटणी मिक्स करायची आणि ढवळून घ्यायचे. छान ओलसर असे सारण तयार होते. चीज किसून घ्यायचे.
४. ब्रेड घ्यायचा आणि ब्रेड स्लाइसला एका बाजूला टोमॅटो सॉस लावायचा. तयार सारण भरायचे. त्यात किसलेले थोडे चीज घालायचे आणि मग आणखी एका स्लाइसला त्यावर ठेवायचे. वरतून बटर लावायचे. तव्यावर थोडे बटर लावा आणि त्यावर सॅण्डविच कुरकुरीत परतायचे. खमंग आणि खुसखुशीत असे सॅण्डविच या पद्धतीने एकदा नक्की करुन पाहा.