मेथी थेपला हा गुजरातसह महाराष्ट्रातही आवडीने खाल्ला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे. मेथीच्या कोवळ्या पानांपासून तयार होणारा हा पदार्थ चवदार तर असतोच, पण आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्त मानला जातो. घरच्याघरी करता येणारा असा डब्यासाठी, प्रवासात खाण्यासाठी किंवा रोजच्या साध्या जेवणात मेथी थेपला हमखास केला जातो. ( Soft and tasty methi thepla recipe, nutritious and easy recipe,it will last for a week)चहासोबत हा पदार्थ अगदी मस्त लागतो. गुजराती लोकांमध्ये नाश्ता, जेवण, मधली सुट्टी सगळ्याच प्रसंगी थेपला आवडीने खाल्ला जातो. थंडीत खास थेपला करुन खाणे म्हणजे सुखच. करायला अगदीच सोपा असतो. पाहा मस्त रेसिपी.
साहित्य
मेथी, पाणी, मीठ, पांढरे तीळ, हळद, लाल तिखट, हिरवी मिरची, जिरे, आलं, लसूण, दही, तेल, बेसन, गव्हाचे पीठ, कसूरी मेथी, ओवा
कृती
१. छान ताजी मेथी निवडून घ्यायची. मस्त स्वच्छ करायची आणि बारीक चिरायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. आल्याचा लहानसा तुकडा घ्यायचा. हिरवी मिरची, लसूण आणि आलं यांची पेस्ट करुन घ्यायची.
२. एका परातीत बारीक चिरलेली मेथी घ्यायची. त्यात आलं - मिरची - लसूण पेस्ट घालायची. तसेच दोन चमचे गव्हाचे पीठ आणि अर्धा चमचा बेसन या प्रमाणाने पीठ घ्यायचे. त्यात हातावर मळून थोडी कसुरी मेथी घालायची. तसेच थोडा ओवाही मळून घालायचा.
३. चमचाभर हळद घालायची. चमचाभर लाल तिखट घालायचे. थोडे पांढरे तीळ घालायचे. थोडे दही घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे. पीठ जरा एकजीव करायचे. नंतर हळूहळू पाणी ओतून मऊसर असे पीठ मळायचे. छान पीठ मळल्यावर त्याला तेल लावायचे आणि थोडावेळ त्यावर कापड ठेवायचे.
४. पोळपाटाला तेल लावायचे. पीठ लावायचे आणि मध्यम जाड असा थेपला लाटून घ्यायचा. तव्याला तेल लावायचे. त्यावर तयार केलेला थेपला मस्त खमंग परतून घ्यायचा. चवीला अगदी मस्त लागतो आणि करायलाही अगदीच सोपा आहे.
