Join us

Shravan Special Recipe: वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यात आहे छोटासा फरक; श्रावण विशेष पारंपरिक रेसेपी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 18:08 IST

Shravan Special Recipe: श्रावणात कांदा लसूण विरहित रेसेपी करणं हे गृहिणींसमोर आव्हान असतं, अशा वेळी पारंपरिक रेसेपी कामी येतात; डाळिंब्यांची उसळ त्यापैकीच एक!

सद्यस्थितीत आपण फास्टफूड, जंक फूड, पॅकेट फूड, फॅन्सी फूड यांच्या एवढे आहारी गेलो आहोत, की पारंपरिक पदार्थही रुचकर लागू शकतात, याचा जणू काही आपल्याला विसरच पडत चालला आहे. अशा वेळी रूढी, परंपरेने घातलेली काही बंधनं योग्य वाटतात. महिनाभर कांदा लसूण खायचा नाही म्हटल्यावर आपसुक आपण पर्याय शोधू लागतो आणि पुन्हा आपल्या मुळांशी अर्थात आपल्या परंपरेशी, संस्कृतीशी जोडले जातो. आई, आजीने केलेल्या पाककृती आठवून त्याची पुनरावृत्ती करतो. आज अशीच एक पारंपरिक रेसेपी पाहणार आहोत, ती म्हणजे डाळिंब्यांची उसळ!

जेव्हा हा शब्द पहिल्यांदा ऐकला होता, तेव्हा मला डाळिंबाच्या दाण्यांची उसळही केली जाते, या विचाराने आश्चर्य वाटलं होतं, मात्र जेव्हा पान वाढलं गेलं, तेव्हा भ्रमनिरास झाला. लाल चुटुकदार दाण्यांऐवजी पिवळीधमक वालाची उसळ समोर आली. त्यांना 'डाळिंब्या' का म्हणतात, हे आजतागायत न सुटलेलं कोडं (तुम्हाला माहित असेल तर जरूर सांगा) मात्र वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यातला फरक मात्र लक्षात आला. बिरडं करताना कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण यांचं नेहमी करतो तसं वाटण करून, त्यात भिजवून सोललेले वाल, मसाले घालून परतले जातात, तर डाळिंब्यांच्या उसळीला यापैकी काहीच तामझाम नसतो, तरी ती अतिशय रुचकर लागते आणि श्रावणात(Shravan Special Recipe) नैवेद्याच्या ताटात मान मिळवते. 

साहित्य:

३/४ कप वालफोडणीसाठी १ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, ४ कढीपत्ता पाने२ टेस्पून सुका नारळ१ टिस्पून जिरे१ टिस्पून गूळ२ आमसुलं१/४ कप कोथिंबीर२ टेस्पून ओला नारळचवीनुसार मिठ

कृती:

१) वाल कोमट पाण्यात १० ते १२ तास भिजत ठेवावे. नंतर पाणी काढून टाकून भिजलेले वाल मोड आणण्यासाठी पंच्यात ८ ते १० तास गच्च बांधून ठेवावे. डाळींब्यांना मोड आले कि कोमट पाण्यात १० मिनीटे टाकून ठेवावे. डाळींब्या सोलून घ्याव्यात. मोड आलेल्या डाळींब्या हाताळताना त्या अख्ख्या राहतील याची काळजी घ्यावी. साधारण सव्वा ते दिड कप डाळींब्या होतील.

२) कढईत किसलेला सुका नारळ मध्यम आचेवर भाजून घ्यावे. नंतर जिरे खरपूस भाजून घ्यावे. नंतर भाजलेला नारळ आणि भाजलेले जिरे निट कुटून घ्यावे.

३) कढईत तेल गरम करावे. त्यात १/४ टिस्पून मोहोरी घालून तडतडू द्यावी. नंतर जिरे, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. कढीपत्ता आणि कोथिंबीर घालावी. थोडावेळ परतून डाळींब्या घालाव्यात. हलक्या हाताने परतावे. थोडा पाणी घालावे. १ ते २ टिस्पून कुटलेले जिरे-खोबरे, आमसुलं आणि मिठ घालून वाफ काढावी.

४) डाळींब्या अर्ध्या शिजल्या की गूळ घालून वाफ काढावी. डाळींब्या खुप नाजुक असतात पटकन मोडल्या जातात म्हणून हलक्या हाताने परतावे.उसळ तयार झाली की ओला नारळ घालावा. गरमागरम पोळ्यांबरोबर सर्व्ह करावे.

टॅग्स :श्रावण स्पेशलश्रावण स्पेशल पदार्थअन्नपाककृतीभारतीय उत्सव-सण