आजपासून श्रावण(Shravan 2025) सुरु झाला. त्यात आज पहिला श्रावण शुक्रवार, जिवती पूजन(Jivati Puja 2025) तसेच घरातील देवीची पूजा झाल्यावर नैवेद्य ओघाने आलाच! इथून पुढे महिनाभर म्हणजेच २२ ऑगस्ट पर्यंत काही ना काही निमित्ताने गोडधोड सुरूच राहणार आहे. यासाठी नवनवीन पदार्थ(Shravan Special Recipe) करून बघायचे. प्रमाणात खायचे आणि रुचकर जेवून सुद्धा व्यायाम करून वजन मेंटेन ठेवायचं. बरोबर ना? चला तर आजच्या पहिल्या शुक्रवारनिमित्त पाहूया कोकोनट मलई खीर रेसेपी -
साहित्य :
• २ टेबलस्पून तांदूळ
• ७-८ काजू
• ६-७ केशरच्या काड्या
• ३-४ हिरवी वेलची हे सर्व पाव कप दुधासह मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
• १ टेबलस्पून तूप
• ९-१० बदाम (चिरलेले)
• १ नारळ किसून घेतलेला (त्याचा तपकिरी भाग घेऊ नका)
• १.५ लिटर दूध (फुल क्रीम किंवा टोन्ड)
• २ टेबलस्पून मनुका
• ६-७ टेबलस्पून साखर (आवडीनुसार घ्या)
कृती :
१. जाड तळाच्या पॅनमध्ये, १ टेबलस्पून तूप गरम करा.
२. चिरलेले बदाम आणि काजू घाला आणि हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
३. १.५ लिटर दूध घाला आणि एक उकळी येईपर्यंत तापवून घ्या.
४. खोबरे किसून घ्या.
५. दूध उकळले की, त्यात किसलेले खोबरे घाला आणि ५-६ मिनिटे उकळू द्या.
६. तयार केलेली तांदळाची पेस्ट घाला आणि तांदूळ शिजेपर्यंत आणि खीर थोडी घट्ट होईपर्यंत शिजवा.
७. २ चमचे मनुका आणि ६-७ चमचे साखर घाला. चांगले मिसळा आणि आणखी काही मिनिटे शिजवा.
ही खीर गरम किंवा थंडगार सर्व्ह करता येते. नैवेद्याच्या ताटातही ती शोभून दिसेल हे नक्की!
पहा व्हिडिओ :