अनेक जण बटाटा सोलण्याऐवजी सालासकटच त्याची भाजी, उसळ किंवा परतून पदार्थ करतात. काही जणांना हे आरोग्यदायी वाटते, तर काहींना साल खाल्लं तर काही त्रास होईल का? असा प्रश्न पडतो. खरं तर बटाट्याचे साल खाण्याचे काही फायदे आहेत, तसेच काही परिस्थितीत त्याचे तोटेही होऊ शकतात. (Should we eat potato skin? What happens if you eat them? See the correct way to eat potatoes)योग्य माहिती आणि काळजी घेतली तर सालासकट बटाटा खाणे सुरक्षित ठरु शकते. बटाट्याच्या सालात भरपूर प्रमाणात फायबर असते. हे फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करते. ज्यांना पोट साफ न होण्याची तक्रार असते, त्यांच्यासाठी सालासकट बटाटा उपयोगी ठरु शकतो. तसेच या सालीत पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि काही प्रमाणात व्हिटॅमिन सी व बी समूहातील घटक असतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते आणि थकवा कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळेच बटाट्याचे साल चेहऱ्यालाही काही जण चोळतात.
बटाट्याचे साल अँटी ऑक्सिडंट्सने समृद्ध असते. हे अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक घटकांशी लढण्यास मदत करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास हातभार लावतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही सालासकट बटाटा खाणे फायदेशीर ठरु शकतो, कारण फायबरमुळे लवकर पोट भरल्यासारखे वाटते आणि ओव्हरइटींग होत नाही.
मात्र, बटाट्याचे साल खाण्याचे काही तोटेही लक्षात घेणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वच्छता. बटाट्याच्या सालावर माती, जंतू, रसायने किंवा कीटकनाशकांचे अवशेष असू शकतात. नीट धुतले नाहीत तर हे घटक पोटाला त्रास देऊ शकतात, जसे की उलटी, पोटदुखी किंवा जुलाब. हिरवट डाग असलेले किंवा अंकुर आलेले बटाटे सालासकट खाणे टाळावे. अशा बटाट्यांच्या सालीत सोलॅनिन नावाचे विषारी द्रव्य असते, जे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. यामुळे मळमळ, डोकेदुखी, पोटदुखी यांसारखे त्रास होऊ शकतात. अशा वेळी साल काढून टाकणे किंवा तो बटाटा पूर्णपणे वापरणे टाळणेच योग्य ठरते.
ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, ज्यांना गॅस, अॅसिडिटी किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो, त्यांनीही सालासकट बटाटा खाताना सावधगिरी बाळगावी. मुळात बटाटाच खाणे टाळावे. सालीतील जास्त फायबर काही जणांना जड जाऊ शकते आणि पोटात अस्वस्थता निर्माण करू शकते. त्यामुळे सालासकट बटाटा खाणे आरोग्यासाठी त्रासाचे ठरतेच असे नाही. किंवा फार फायद्याचे ठरते असेही नाही.
