Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकघरात स्मार्टपणे करा गॅसची बचत, खर्च होईल कमी आणि इंधनही वाचेल भरपूर ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2026 13:23 IST

Save gas in the kitchen smartly, you will spend less and save a lot : गॅसची करा बचत रोज. पाहा काय करावे.

आजच्या वाढत्या तणावजन्य काळात घरातील प्रत्येक गोष्ट जपून वापरणे गरजेचे झाले आहे. त्यात स्वयंपाकघरातील गॅस हा दररोज लागणारा आणि महत्त्वाचा. अनेकदा नकळत होणाऱ्या छोट्या चुका गॅस जास्त खर्च होण्यास कारणीभूत ठरतात. मात्र काही सोप्या सवयी अंगीकारल्या तर इंधनाची बचत करता येते आणि सिलेंडरही जास्त दिवस टिकतो.

स्वयंपाक करताना सर्व साहित्य आधीच तयार ठेवणे खूप महत्त्वाचे असते. भाज्या चिरणे, मसाले काढणे किंवा पीठ मळणे ही कामे गॅस सुरू करण्यापूर्वी केली तर गॅस विनाकारण चालू राहत नाही. यामुळे वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होते. (Save gas in the kitchen smartly, you will spend less and save a lot of fuel.)प्रेशर कुकरचा वापर हा गॅस बचतीचा उत्तम उपाय मानला जातो. डाळ, तांदूळ, बटाटे किंवा कडधान्ये कुकरमध्ये लवकर शिजतात. त्यामुळे कमी वेळेत पदार्थ तयार होतो आणि गॅसही कमी लागतो. शिवाय उगाच जास्त शिट्या काढण्याऐवजी कुकर बंद केल्यावर अन्न साठलेल्या वाफेवर शिजू द्यावे.

भांड्याला योग्य आकाराचे झाकण वापरणेही तितकेच गरजेचे आहे. झाकण ठेवून स्वयंपाक केल्यास उष्णता बाहेर जात नाही आणि पदार्थ पटकन शिजतो. सतत उघडून पाहिल्यास गॅसचा वापर वाढतो. डाळी, कडधान्ये किंवा तांदूळ शिजवण्यापूर्वी काही वेळ भिजत ठेवले तर ते लवकर शिजतात. यामुळे गॅस कमी लागतो आणि पदार्थही मऊ व चविष्ट होतो. गॅसची फ्लेम नेहमी भांड्याच्या तळापर्यंतच असावी. खूप मोठी ठेवली तर वायाच जाते आणि भांडेही खराब होते. मध्यम आचेवर स्वयंपाक केल्यास गॅसची बचत होते आणि पदार्थही नीट शिजतो. बर्नर स्वच्छ ठेवणे देखील आवश्यक आहे. बर्नरमध्ये घाण अडकली तर फ्लेम नीट येत नाही आणि गॅस जास्त खर्च होतो. नियमित साफसफाई केल्यास गॅसचा वापर योग्य प्रमाणात होतो.

फ्रीजमधील पदार्थ थेट गॅसवर गरम करण्याऐवजी काही वेळ बाहेर ठेवावेत. खूप थंड पदार्थ गरम करण्यासाठी अधिक वेळ आणि जास्त गॅस लागतो. चहा किंवा दूध गरम करताना आवश्यक तेवढेच गरम करणे चांगले. वारंवार गरम केल्यास गॅस वाया जातो. तसेच लहान प्रमाणातील पदार्थांसाठी मोठे भांडे वापरणे टाळावे. या छोट्या पण महत्त्वाच्या सवयी दैनंदिन जीवनात पाळल्या तर गॅसची बचत सहज करता येते. यामुळे केवळ पैशांची बचत होत नाही तर इंधनाचाही योग्य वापर होतो. पर्यावरणासाठीही ही सवय फायदेशीर ठरते.

English
हिंदी सारांश
Web Title : Smart Kitchen: Save Gas, Reduce Expenses, Conserve Fuel Effectively

Web Summary : Conserve gas smartly by planning cooking, using pressure cookers, covering pots, and soaking ingredients. Adjust flame, clean burners, and avoid reheating excessively. These simple habits save money, fuel, and benefit the environment.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सइंधन टंचाईइंधन दरवाढभारतसोशल व्हायरल