lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > नारळाच्या दुधातला शाही पुलाव! चव अशी की तबियत खुश, नारळाच्य दुधाचे फायदे भरपूर  

नारळाच्या दुधातला शाही पुलाव! चव अशी की तबियत खुश, नारळाच्य दुधाचे फायदे भरपूर  

पुलाव म्हणजे चवीची मेजवानी. पुलाव करताना कोण आरोग्याचा, पौष्टिक गुणधर्माचा विचार करणार? पण आपण जेव्हा नारळाच्या दुधाचा पुलाव करणार असू तर या पुलावाची चव विशेष तर आहेच पण हा पुलाव आरोग्यासही लाभदायक आहे असं कौतुकानं सांगता येईल हे नक्की.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 05:47 PM2022-01-15T17:47:01+5:302022-01-15T17:56:51+5:30

पुलाव म्हणजे चवीची मेजवानी. पुलाव करताना कोण आरोग्याचा, पौष्टिक गुणधर्माचा विचार करणार? पण आपण जेव्हा नारळाच्या दुधाचा पुलाव करणार असू तर या पुलावाची चव विशेष तर आहेच पण हा पुलाव आरोग्यासही लाभदायक आहे असं कौतुकानं सांगता येईल हे नक्की.

Royal pilaf in coconut milk! The taste is such that mind become happy. This pilaf gives benefits of coconut milk with royal taste | नारळाच्या दुधातला शाही पुलाव! चव अशी की तबियत खुश, नारळाच्य दुधाचे फायदे भरपूर  

नारळाच्या दुधातला शाही पुलाव! चव अशी की तबियत खुश, नारळाच्य दुधाचे फायदे भरपूर  

Highlightsनारळाच्या दुधातला पुलाव म्हणजे  वेगळ्या चवीची मेजवानी.नारळाचं घट्टसर दूध घरीच केलं तर उत्तम. हा पुलाव कुकरमध्ये शिजवताना गॅसची आच मंद ठेवावी. 

एखाद्या विशेष प्रसंगाचं सेलिब्रेशन घरच्या घरी करायचं असलं किंवा घरी कोणी खास पाहुणे जेवायला येणार असतील तर डोक्यात पुलावाचा पर्याय येतो. पुलाव आणि सोबत रायतं, पापड , सलाड असलं की कामंच होतं. हा बेत असला , की पाहुणे खूष होणारच. पण नेहमी जे येतात तेच तेच पुलाव करुन कंटाळा आला असेल तर वेगळ्या चवीचा, पोषक गुणधर्मांचा असा एक खास पुलाव करता येतो. पुलाव म्हणजे चवीची मेजवानी, तिथेही आरोग्याचा विचार? पण आपण जेव्हा नारळाच्या दुधाचा पुलाव करणार असू तर या पुलावाची चव विशेष तर आहेच पण हा पुलाव आरोग्यासही लाभदायक आहे असं कौतुकानं सांगता येईल हे नक्की.

Image: Google

व्हेगन डाएट करणाऱ्यांना नारळाच्या दुधाची चव आणि वैशिष्ट्यं यांचा चांगला परिचय असतो.  पण एरवी नारळ फोडून नारळाचं दूध काढणंच अनेकांना जिकरीचं वाटतं. तिथे नारळाच्या दुधातला पुलाव म्हणजे काहीतरी अवघड वाटेल. पण हा पुलाव तयार करायला अगदी सोपा आहे. हा पुलाव खाल्ल्यावर त्याच्या चवीनं जे समाधान मिळतं ते आपण आतापर्यंत खात असलेल्या पुलावातून खचितच मिळालं असेल हे नक्की.

https://www.lokmat.com/sakhi/food/breaking-coconut-makes-thick-coconut-milk-seems-complicated-task-there-are-7-simple-tips-coconut-a300/

नारळाचं दूध हे केवळ पदार्थांना चव देत नाही तर आरोग्यासही ते खूप लाभदायक आहे. ज्यांना नेहमीच्या दुधातील लॅक्टोजची ॲलर्जी असते त्यांच्यासाठी नारळाच्या दुधाचा आहारात समावेश करणं हा आरोग्यदायी पर्याय ठरेल. तसेच नारळाच्या दुधात जिवाणुविरोधी, विषाणुविरोधी आणि बुरशीरोधक गुणधर्म असतात. त्यामुळे नारळाचं दूध घालून केलेला कोणताही पदार्थ हा आरोग्यदायी ठरतो. नारळाच्या दुधाचा समावेश करुन अनेक गोड तिखट पदार्थ करता येतात. त्यातला नारळाच्या दुधातला पुलाव हा विशेष आहे. 

Image: Google

कसा करायचा नारळाच्या दुधातला पुलाव?

नारळाच्या दुधातील पुलाव करण्यासाठी लागणारं दूध आपण सहज घरीच तयार करु शकतो. किंवा बाहेर दुकानातही हे रेडीमेड स्वरुपात मिळतं.  हा पुलाव करण्यासाठी 1 कप बासमती तांदुळ, 1 मध्यम आकाराचा बारीक पण उभा चिरलेला कांदा, आलं-लसूण आणि मिरचीची पेस्ट ( आपल्याला किती तिखट चालतं, आवडतं यानुसार ही पेस्ट वापरावी) , अर्धा कप ताजे मटार दाणे, पाऊण कप बारीक कापलेला घेवडा, 5 ते 6 कढीपत्याची पानं, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 छोटी वेलची, एक इंच दालचिनी,  थोडी जायपत्री, अर्धा छोटा चमचा जिरे, पाऊण कप नारळाचं घट्टसर दूध, 1 ते  सव्वा कप पाणी, 2 मोठे चमचे तेल, थोडी बारीक कापलेली कोथिंबीर आणि  चवीनुसार मीठ घ्यावं. 
नारळाच्या दुधातील पुलाव करण्यासाठी जर घरी नारळाचं दूध करणार असू तर ते आधी तयार करुन ठेवाव. अवघ्या पाच मिनिटात घरच्याघरी नारळाचं घट्टसर दूध मिळतं. 

Image: Google

बासमती तांदूळ निवडून चांगले धुवून घ्यावेत. धुतलेला तांदूळ 20- 25 मिनिटं पाण्यात भिजवावा.  नंतर पाणी काढून तांदूळ निथळत ठेवावा. तांदूळ भिजेपर्यंत भाज्या चिरुन घ्याव्यात. आलं-लसूण-मिरचीची पेस्ट करुन ठेवावी.  
सर्व तयारी झाली, तांदूळ चांगले निथळले की मग कुकरमधे तेल घालून ते गरम करायला ठेवावं. तेल गरम झाले की एक एक करुन सर्व खडा मसाला तेलात टाकून परतावा. खडा मसाला  परतल्यावर जिरे घालावेत म्हणजे ते चांगले फुलतात आणि काळे होत नाही. नंतर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून ते परतून घ्यावं. आलं-लसूण-मिरचीची पेस्ट घालावी. लसणाचा कच्चेपणा गेला की यात चिरलेल्या भाज्या, मटार दाणे घालावेत. यात आपल्या आवडीच्या आणखी काही भाज्या घातल्या तरी चालतात. भाज्या घातल्यावर त्या  1 मिनिट परताव्यात. भाज्या परतल्या की त्यात तांदूळ घालावेत. तांदूळ परतताना हलक्या हाताने परतावेत. तांदूळ परतले की त्यात नारळाचं दूध घालावं. हे दूध तांदळात चांगलं मिसळून घ्यावं. लगेच त्यात गरम केलेलं पाणी घालावं. पाणी घातल्यानंतर मिश्रण चांगलं ढवळून घ्यावं. कुकरला झाकण लावून मंद आचेवर 8 ते 9 मिनिटं ठेवावा.  शिट्टी नाही घेतली तरी पुलाव व्यवस्थित शिजतो.

मोठ्या आचेवर शिट्टी घेऊन पुलाव लवकर करण्याचा प्रयत्न केल्यास कुकरला तळाशी करपून पुलावाची चव बिघडते. त्यामुळे हा पुलाव मंद आचेवर शिजवावा.  गॅस बंद केल्यानंतर वाफ निघून गेल्यावर कुकरचं झाकण काढून तयर पुलावावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी. हा पुलाव रायता, सलाड, पापड यासोबत छान लागतो. 

 
 

Web Title: Royal pilaf in coconut milk! The taste is such that mind become happy. This pilaf gives benefits of coconut milk with royal taste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.