Join us  

 नाश्त्याला 'असे' पोहे खाल तर मिळतील दुप्पट फायदे; आहारतज्ज्ञांनी सांगितली बनवण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 11:06 AM

Poha Recipe : पोषणतज्ज्ञांच्या मते, पोहे खाल्ल्यानं तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. जर तुम्ही त्यात काही अतिरिक्त प्रयोग केले तर त्याचा तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होईल.

ठळक मुद्देपोह्यात पातीचा कांदा चिरून घाला, जो साखरेची पातळी, कॅन्सर, डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त, हे आपल्याला सर्दी आणि फ्लूपासून वाचवते.पोषणतज्ज्ञांच्या मते, पोहे खाल्ल्यानं तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. जर तुम्ही त्यात काही अतिरिक्त प्रयोग केले तर त्याचा तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होईल.  

आरोग्यासाठी सर्वात हलका फुलका नाश्ता असलेले पोहे आपणा सर्वांना माहिती आहेत. मजेशीर गोष्ट म्हणजे पोहे बनवायला जास्त वेळ लागत नाही. त्यात बटाटा, शेव, शेंगदाणे असे वेगवेगळे पदार्थ घालून आपण त्याची चव वाढवू शकता. बहूतेक लोक सकाळच्या नाश्त्यात पोहे खातात. मुलं आणि वृद्ध लोक देखील मोठ्या उत्साहाने हा पदार्थ खातात. परंतु जर तुम्हाला पोहे आरोग्यासाठी पौष्टिक बनवायचे असतील तर डॉक्टर आणि पोषणतज्ज्ञांनी सांगितलेली पद्धत नक्कीच फायद्याची ठरेल. 

अलीकडेच, त्वचा-आरोग्य आणि पोषणतज्ज्ञ डॉ श्रेया यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी पोहे कसे निरोगी पद्धतीने खावे हे सांगितले आहे. श्रेया यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, या माध्यमातून तुम्हाला दाखवायचं आहे की, जागतिक स्तरावर निरोगी अन्नाचा अर्थ केवळ क्विनोआ किंवा एवोकॅडो यांचा समावेश आहारात करणं असं नाही. आपण घरी उपलब्ध असलेल्या  अन्नापासून देखील समान पोषण मिळवू शकता. 

पोषणतज्ज्ञांच्या मते, पोहे खाल्ल्यानं तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. जर तुम्ही त्यात काही अतिरिक्त प्रयोग केले तर त्याचा तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होईल.  पोहे गुड फॅट्स,  प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरवतात. जे आपल्या शारीरिक प्रक्रियांना चांगले ठेवण्यासाठी मदत करतात. 

हेल्दी पोहे कसे बनवावेत?

१) पोह्यात शेंगदाणे घाला, जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

२) कढीपत्ता घातल्यानं रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यास मदत होईल.

३) पोह्यात पातीचा कांदा चिरून घाला, जो साखरेची पातळी, कॅन्सर, डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त, हे आपल्याला सर्दी आणि फ्लूपासून वाचवते.

४) आपण पोह्यामध्ये भाजलेली उडीद डाळ देखील घालू शकता, जे मधुमेह आणि हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

पोहे करताना या गोष्टी लक्षात ठेवा

१) कोणतेही पोहे असोत जाड किंवा पातळ, प्रथम चाळून घ्या. कांद्या पोह्यांना शक्यतो जाड पोहे घेणं उत्तम. पोहे चाळून घ्या जेणेकरून त्यातील नाक म्हणजे लहान-लहान तुकडे आणि भुसा निघून जाईल. पोहे भिजवावे असे सांगितले तर जाते. पण बऱ्याचदा किती वेळ भिजवावे, कसे भिजवावे याचा अंदाज चुकल्याने त्याचा गिचका होतो. ते टाळण्यासाठी पोहे पाण्याखाली धरून धुवावेत आणि चाळणीत ठेवावे.

२) पातळ पोहे करायचे असल्यास किंवा दडपे पोहे करताना पाेह्यांना पाण्याचा हात लावला तरी ते मऊ होतात. त्यांना भिजवायची गरज नाही. कांदा घालणार असल्यास चिरलेल्या कांद्यात पोहे कालवून ठेवले तरी जमते. पोह्यात मीठ घालताना शेवटी घालावे. म्हणजे सर्वत्र समान लागते.

३) दगडी पोहे म्हणजे आपल्या जाड पोह्यांपेक्षा थोडे जाड पोहे. या पोह्याचा तळून केलेला चिवडा छान होतो. कांदे पोहे करताना फोडणीत कांदा टाकून तो लाल होताना थोडे लिंबू पिळावे. म्हणजे कांदा चकचकीत दिसतो.

४) तिखट पोहे करताना कांदा पोह्याच्या प्रमाणाच्या अर्धा घ्यावा. कांदा खूप बारीक चिरू नये.पोह्यांमध्ये मटार /गाजर /वांगी असे काहीही घालणार असल्यास प्रथम ते व्यवस्थित उकडून अथवा शिजवून घ्यावे. मगच फोडणी करावी.

५) दडपे पोहे करताना पोह्यांना नारळ पाणी किंवा नारळ दूध यांचा शिपकारा दिला तर चव वाढते. दही पोहे करताना जे दही वापरणार आहात, ते १० मिनिटे टांगून ठेवावे. अशा दह्यात कालविलेले पोहे मुलायम पोताचे होतात.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्नपाककृतीतज्ज्ञांचा सल्ला