पांढरा ढोकळा आवडतो? मग हे पौष्टिक ढोकळा सॅण्डविच नक्कीच आवडेल. चवीला अगदी मस्त आणि मऊ असे हे सॅण्डविच करायला अगदी सोपे आहे. (Nutritious Dhokla Sandwich Recipe - Make this quick dish for breakfast, soft and fluffy Dhokla is great for a snack)
ढोकळ्यासाठी साहित्य
रवा, दही, मीठ, पाणी, तेल, बेकींग सोडा, लाल तिखट
सारण सामग्री
मक्याचे दाणे, सिमला मिरची, चीज, ओरेगॅनो, मीठ, काळीमिरी पूड, कोथिंबीर
कृती
१. एका खोलगट पातेल्यात एक कप रवा घ्यायचा. त्यात एक कप दही घालायचे. जेवढा रवा तेवढेच दही हे प्रमाण लक्षात ठेवा. अगदी सोपे आहे. दही आणि रवा एकजीव करुन घ्यायचे. त्यात थोडे पाणी घालायचे. पाणी दही आणि रवा एकजीव करायचे. झाकून किमान १५ मिनिटांसाठी ठेवायचे.
२. सारण तयार करण्यासाठी मक्याचे दाणे शिजवून किंवा उकळून घ्यायचे. त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची घालायची. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची. किसलेले चीज घालायचे. थोडे ओरेगॅनो घालायचे. चवी पुरते मीठ घालायचे. चमचाभर काळीमिरी पूड घालायची. सगळे छान मिक्स करायचे.
३. रवा आणि दह्याचे मिश्रण पंधरा मिनिटांनी जरा फुलेल मग त्यात अर्धा चमचा बेकींग सोडा घालायचा. तसेच दोन चमचे तेल घालायचे. व्यवस्थित ढवळायचे. पाच मिनिटे पुन्हा झाकायचे आणि नंतर पुन्हा ढवळायचे. जास्त घट्ट झाले असेल तर थोडे पाणी घाला. मध्यम पातळ मिश्रण तयार झाल्यावर एका खोलगट भांड्याला तेल लावायचे. ढोकळा पात्र असेल तर उत्तमच नसेल तर कोणतेही खोलगट पातेले चालेल.
४. पातेल्याला तेल लावल्यावर त्यात थोडे मिश्रण ओतायचे. थोडी जाड लेअर तयार होईल. मग त्यावर लाल तिखट भुरभुरायचे. कुकरमध्ये किंवा इडली पात्रात दहा मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे. सुरीने एकदा तपासायचे ढोकळा शिजला असेल तर काढून घ्यायचा. आणखी एक असाच ढोकळा लावायचा आणि तोही काढून घ्यायचा.
५. तयार सारण ढोकळ्यावर लावायचे. वरतून दुसरा ढोकळा ठेवायचा आणि मग आणखी एकदा वाफवून घ्यायचे. नंतर त्याचे तुकडे करायचे आणि चटणी किंवा सॉससोबत खायचे.