लापशी रवा फार पौष्टिक असतो. त्याचे गोड पदार्थ केले जातात. मात्र त्यापासून चविष्ट आणि चमचमीत पदार्थही करता येतात. डाएटमध्ये लापशी रव्याची खिचडी म्हणजेच तिखट दलिया नक्की असावा. ( nutritious and tasty recipe - a tasty way to lose weight, must try this daliya recipe )पोटभरीचा असतो. चव चांगली असते आणि त्यात फायबर असतात. पोषणतत्त्वे असतात मात्र त्यात फॅट्स फार कमी असतात. त्यामुळे असा दलिया नक्की खा. आहारात असेल तर पोटाला आराम मिळेल. पाहा कसा करायचा.
साहित्य
लापशी रवा (दलिया), कांदा, लसूण, आलं, फरसबी, टोमॅटो, तूप, मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, पाणी, मीठ, मूगडाळ
कृती
१. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. फरसबी चिरुन घ्यायची. तसेच टोमॅटोही चिरुन घ्यायचा. मूगडाळ स्वच्छ धुऊन घ्यायची. वाटीभर मूगडाळ वाटीभर लापशी रवा असे प्रमाण ठेवायचे. आलं किसून घ्यायचे. लसूण ठेचून घ्यायची.
२. एका कुकरमध्ये चमचाभर तूप घ्यायचे. तुपावर चमचाभर जिरे घालायचे. जिरे छान फुलल्यावर त्यात चमचाभर मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यावर त्यात लसूण घाला. तसेच किसलेले आले घालायचे. त्यात कांदा घाला आणि छान परतून घ्या. मग त्यात फरसबी घालायची, छान परतायची. फरसबी परतून झाल्यावर त्यात टोमॅटो घाला. छान परता.
३. चमचाभर हळद, चमचाभर लाल तिखट घाला. परतायचे आणि मग लापशी रवा घालायचा. छान परतायचा. दोन ते पाच मिनिटे परता मग त्यात मूगडाळ घाला. मीठ घालायचे. ढवळायचे. कुकरला चिकटायला लागले की पाणी ओता. उकळी काढा. रवा जरा फुलला की झाकण लावा आणि शिट्या काढून घ्या. गरमागरम खा. वाढून घेताना वरतून चमचाभर तूप घ्यायचे.
