लहान मुलांना नानकटाई किंवा बिस्कीटं खायला फार आवडतात. मात्र त्यात भरपूर मैदा असतो तसेच साखरही भरपूर असते. त्यामुळे बिस्कीट खाणे आरोग्यासाठी फार वाईट ठरते. पण तुम्हाला माहिती आहे का घरीही बिस्कीट करता येते. (No oven recipes, make nutritious food at home, must try recipe, sweet recipes.)त्यासाठी फार काही लागत नाही किंवा ओव्हन असायलाच हवा असेही नाही. साध्या तव्यावरही करता येतात. पाहा नाचणीची नानकटाई करण्याची रेसिपी.
साहित्य
नाचणी, गूळ, तूप, कणीक, रवा, वेलची, बेकींग पावडर, बेकींग सोडा, डेसिकेटेड कोकोनट, दूध, सुर्यफुलाच्या बिया, काजू, बदाम , बेकींग पेपर '
कृती
१. एका मिक्सरच्या भांड्यात नाचणीचे पीठ घ्यायचे. वाटीभर नाचणीचे पीठ असेल तर अर्धी वाटी कणीक घ्यायची. पाव वाटी रवा घ्यायचा. मिक्सरमधून ते मिश्रण वाटून घ्यायचे. एकजीव करुन घ्यायचे. गूळ किसून घ्यायचा. वाटीभर गूळ घ्यायचा. सुका गूळ घ्या, ओलसर नको.
२. मिश्रणात गूळ घाला आणि मिक्सरमधून पुन्हा फिरवून घ्या. एका परातीत मिश्रण काढून घ्यायचे. त्यात चमचाभर बेकींग सोडा घाला तसेच थोडी बेकींग पावडरही घाला. वेलची पूड घाला आणि थोडा डेसिकेटेड कोकोनट घाला. हाताने सगळं मिक्स करायचे. तूप गरम करा आणि मिश्रणात ओता. हळूहळू दूध घालून पीठ मळून घ्यायचे. अगदी चार ते पाच चमच्यात पीठ मळलं जातं. सैलसर मऊ असे पीठ मळायचे. झाकून थोडावेळ ठेवायचे.
३. तव्याला बेकींग पेपर लावायचा. पीठाचे गोळे करायचे आणि चपट बिस्कीटाचा आकार देऊन ते तव्यावर लावायचे. काजूचे तुकडे करायचे. बदामाचेही तुकडे करायचे. सुर्यफुलाच्या बिया आणि काजू बदाम एकत्र करायचे. कुकीजच्या वर लावायचे. तवा मंद आचेवर ठेवायचा. त्यावर झाकण ठेवायचे. २० मिनिटे लागतात. २० ते २५ मिनिटांत खमंग खुसखुशीत बिस्कीटं तयार होतात.
