चटणी जेवणात तोंडी लावायला असेल तर जेवण अधिक चवदार, खमंग होते हे अगदी खरे आहे. पण चटणीचे आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये फक्त तेवढेच महत्त्व नाही. कारण अनेक आहारतज्ज्ञ असं सांगतात की भाजी, आमटी, भात, पोळ्या यांच्यामधूनही जे काही पौष्टिक घटक मिळत नाहीत, ते चटण्यांमधून मिळतात. त्यामुळे आपल्या रोजच्या जेवणात १ चमचा चटणी तरी असायलाच हवी. आता शेंगदाणा, खोबरे, जवस, तीळ, कारळं अशा वेगवेगळ्या चटण्या आपण खातोच. त्याच जोडीला आता एका खास चटणीची रेसिपी पाहूया. ही चटणी तुम्हाला अगदी भरभरून प्रोटीन्स, खनिजे, व्हिटॅमिन्स देते. बघा रेसिपी..
आरोग्यासाठी पॉवरहाऊस असणारी मल्टीव्हिटॅमिन चटणी रेसिपी
साहित्य
१ वाटी शेवग्याची पाने
अर्धी वाटी कडिपत्ता
जवस, शेंगदाणे, तीळ, फुटाणे, खोबरे असं प्रत्येकी पाव- पाव वाटी
१ टेबलस्पून गूळ
पोटावरची, कंबरेवरची चरबी खूपच वाढली? 'बॉडी ट्विस्ट' करा- काही दिवसांतच व्हाल स्लीम..
१ टेबलस्पून चिंचेचे बारीक केलेले तुकडे
१ टीस्पून जिरे आणि धने
चवीनुसार मीठ आणि लाल तिखट. लाल तिखटाऐवजी तुम्ही वाळलेल्या लाल मिरच्याही वापरू शकता.
कृती
सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि तिच्यामध्ये शेवग्याची पानं घालून ती मंद आचेवर भाजून घ्या. त्या पानांमधला ओलसरपणा निघून जायला हवा. आता त्याचप्रमाणे कडिपत्ताही भाजून घ्या.
यानंतर जवस, शेंगदाणे, तीळ, फुटाणे, खोबऱ्याचा किस, जिरे, धने असं सगळं एकेक करून मंद आचेवर भाजून घ्या.
म्हातारपणी हाडांचं दुखणं नको ना? ५ गोष्टी आतापासूनच करा- साठीनंतरही हाडं राहतील दणकट
भाजून घेतलेले पदार्थ थंड झाल्यानंतर आधी शेवग्याची पानं आणि कडिपत्ता मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर करून घ्या.
यानंतर बाकीचे भाजून घेतलेले पदार्थ, गूळ, चिंच, मीठ, लाल तिखट घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. आता सगळे पदार्थ एकत्र केले की तयार झाली तुमची मल्टीव्हिटॅमिन चटणी