उपासाला केली जाणारी साबुदाणा खिचडी चवीला मस्तच लागते. घरोघरी ही खिचडी केली जाते. मात्र रेसिपी नक्कीच प्रत्येकाची जरा वेगळी असते. एकदा नाश्त्यासाठी या पद्धतीने खिचडी करुन पाहा. ती उपासासाठी नाही , मात्र नाश्त्यासाठी एकदम मस्त आहे. (Make spicy sago khichdi for breakfast - a different taste than usual, easy to make and delicious) जर तुम्हाला तिखट खायला आवडते, तर हा पदार्थ नक्की करुन पाहा. अगदी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे. रात्री साबुदाणा भिजत घालायला मात्र अजिबात विसरु नका. पाहा तिखट साबुदाणा खिचडी कशी करायची.
साहित्य 
साबुदाणा, बटाटे, लाल तिखट, मीठ, तेल, कडीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कुट, जिरं, हिरवी मिरची, तूप
कृती
१. साबुदाणा रात्रभर भिजवायचा. सकाळीपर्यंत छान फुलतो. मग त्यात दोन ते तीन चमचे लाल तिखट घालायचे. साबुदाणा मिक्स करायचा. लाल तिखट छान सगळीकडे लागले की बाजूला ठेवायचा. मग हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. कोथिंबीर निवडायची आणि मग बारीक चिरायची. बटाटे सोलायचे त्याचे तुकडे करायचे.  
२. एका कढईत चमचाभर तेल घ्यायचे. जिरे घालायचे. जिरे मस्त फुलू द्यायचे. जिरे छान फुलेले की त्यात शेंगदाणे घालायचे आणि छान परतून घ्यायचे. मग त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. तसेच कडीपत्ता घालायचा आणि छान परतून घ्यायचा.
३. त्यात बटाट्याचे तुकडे घालायचे आणि परतून घ्यायचे. बटाटा छान परतून झाल्यावर त्यात साबुदाणा घालायचा. साबुदाणाही परतून घ्यायचा. छान खमंग परतायचा. मग त्यात चमचाभर तूप घालायचे. एक वाफ काढायची. शेंगदाण्याचे कुट घालायचे. ढवळून घ्यायचे. मस्त लालसर खमंग तिखट साबुदाणा खिचडी खा. चवीला मस्त लागते.



